सोलापूर - आतापर्यंत आपण निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धा ऐकल असाल पण सोलापुरात चक्क भाकरी बनवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. भारतात प्रथमच सोलापुरातील ओम गर्जना चौक जुळे सोलापूर या ठिकाणी ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. भाकरी बनवण्याची स्पर्धा दोन दिवस होणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या महिलांना 11 हजार रुपयांचा बक्षीस देखील मिळणार आहे. या स्पर्धे संदर्भात अधिक माहिती काशिनाथ गुरुशांत भतगुणकी यांनी Local 18 शी बोलताना दिली.
advertisement
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त ड्रीम फाऊंडेशन, जिजाऊ भाकरी केंद्र उद्योग समूह चाणक्य गुरुकुल आणि श्री सिध्देश्वर भोजनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतात प्रथमच भाकरी बनवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. काशिनाथ गुरुशांत भतगुणकी यांनी महिलांसाठी राज्यस्तरीय भाकरी बनविण्याची स्पर्धा आयोजन केले आहे.
व्यसनाधीनतेविरोधात 4000 किमीची यात्रा, 69 वर्षीय तरुणाची जनजागृतीसाठी मोहीम
2 तासांत सर्वात जास्त, पातळ भाकरी बनविणाऱ्या महिलांना पहिले बक्षीस रोख 11 हजार रुपये, दुसरे बक्षीस रोख 7 हजार तर तिसरे बक्षीस रोख 5 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना सहभाग प्रमाणपत्र, एक बॅग, मकर संक्रांती स्पे. भेट वस्तु, देण्यात येणार आहे. भाकरी बनवण्याच्या स्पर्धेत 450 ते 500 महिलांनी भाग घेतला आहे.
महिलांना आत्मसन्मान मिळावा सोलापूरच्या भाकरीला नवीन ओळख मिळावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. भाकरी बनवण्याच्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भाकरी ही बेकारीच्या मुक्तीसाठी होऊ शकते या उद्देशाने ही स्पर्धा सुरू आहे. जवळपास या भाकरीच्या स्पर्धेतून 20 ते 30 हजार भाकरी तयार होणार आहेत. या स्पर्धेत तयार होणाऱ्या भाकऱ्या सोलापुरातील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांना ही भाकरी मोफत देण्यात येणार आहे. तसेच कलबुर्गी येथील भारतीय संस्कृती उत्सवमध्ये तेथील देशभरातील भाविकांना ही भाकरी मोफत देण्यात येणार असल्याची माहिती काशिनाथ गुरुशांत भतगुणकी यांनी दिली.