कांजी वडा म्हणजे काय?
कांजी म्हणजे मोहरी, मीठ आणि हिंग याचे पाणी. साध्या पाण्यात हिंग, मीठ आणि मोहरी टाकून ते पाणी 2 ते 3 तास उन्हात झाकून ठेवतात. त्यानंतर त्याचा थोडा आंबट सुवास यायला लागला की, कांजी तयार होते. त्यानंतर या पाण्यात उडीद डाळ किंवा मुगाच्या डाळीचे वडे बनवून टाकतात. त्यानंतर तयार होतो कांजी वडा.
advertisement
Gajar Halwa Recipe: गाजर हलव्याची परफेक्ट रेसिपी, असा बनवाल तर बोटं चाखत बसाल, Video
कांजी वड्याचा इतिहास काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कांजीचा उगम प्राचीन भारतीय आयुर्वेदिक परंपरेतून झाल्याचे मानले जाते. पूर्वी कांजी मातीच्या भांड्यात उन्हात ठेवून तयार केली जायची. तसेच उडीद डाळ आणि मुगाची डाळ या दोन्ही थंड-गरम प्रकृतीच्या आहेत. त्यामुळे वडे या डाळीचे बनवले जातात. हे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने बनवले जात असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहर हे कांजी वड्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
कांजी वड्याचे फायदे कोणते आहेत?
कांजी वडा आहारात घेतल्यास पचनशक्ती वाढविण्यास मदत होते. तसेच आतड्यांसाठी लाभदायक आहे. उडीद डाळीपासून बनवलेला कांजी वडा हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यास मदत करते. तसेच भूक वाढविण्यास देखील मदत होते.
हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने अनेकजण सकाळचा नाश्ता म्हणून कांजी वडा आहारात घेतात. अमरावती शहरातील जवाहर गेटच्या आतमध्ये नानकरामजी दहीवडेवाले यांच्याकडे सकाळच्या वेळी कांजी वडा खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते. हा कांजी वडा 30 रुपये प्लेटप्रमाणे विकला जातो. चवीला टेस्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असा कांजी वडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा.





