लक्ष्मी इंगळे गेल्या एक वर्षापासून हे भोजनालय चालवत आहेत. स्वतः हॉस्टेलमध्ये राहून आणि मेसचे जेवण अनुभवत असताना, खूप पैसे देऊनही समाधानकारक जेवण मिळत नाही, ही त्यांची भावना होती. त्यासाठी त्यांनी सात महिने मेसचे कामही केले. या अनुभवातूनच आपणच असा व्यवसाय का सुरू करू नये, जिथे कमी पैशात चांगलं, घरचं जेवण मिळेल, असा विचार त्यांच्या मनात आला.
advertisement
बाहेर एका वेळच्या जेवणासाठी जेवढे पैसे खर्च होतात, त्याच पैशांत इथे दोन वेळचं जेवण मिळावं, आणि त्यातून विद्यार्थ्यांना थोडी मदतही व्हावी, या उद्देशाने त्यांनी 30 आणि 50 रुपयांच्या थाळ्या सुरू केल्या. या थाळ्यांमध्ये पालेभाज्या, फळभाज्या, वेलभाज्या, पिठलं-भरीत, वरण-भात असा सकस आणि रोज बदलणारा मेनू असतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना घरच्यासारखी चव मिळते.
30 रुपयांच्या थाळीत दोन चपात्या, वरण-भात आणि आवडीची एक भाजी दिली जाते. चपात्या त्या दुसऱ्या एका महिलेकडून घेतात, ज्यामुळे तिच्या उत्पन्नालाही हातभार लागतो. उर्वरित संपूर्ण जेवण लक्ष्मी इंगळे स्वतः तयार करतात. दररोज साधारण 150 ते 300 प्लेट जेवणाची विक्री होते.
या भोजनालयात केवळ स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीच नव्हे, तर रिक्षाचालक, कामगार वर्ग, नोकरदार आणि परिसरातील गरजू नागरिकही जेवायला येतात. कमी किमतीत स्वच्छ, पौष्टिक आणि प्रेमाने बनवलेलं जेवण मिळत असल्याने ‘श्री भोजनालय’ अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे. लक्ष्मी इंगळेंची ही संकल्पना केवळ व्यवसाय न राहता, पुण्यातील अनेक पोटांची भूक भागवणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक आदर्श उपक्रम ठरत आहे.





