थेट आरोग्य तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊयात चाळीशीनंतर स्वत:ला निरोगी ठेवण्याचा मंत्र.
गुरुग्राममधल्या सी के बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. तुषार तायल यांच्या मते, सर्वसाधारणपणे अनेकांना चाळीशीत उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणाच्या समस्या दिसून येतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि जंकफूडमुळे अनेकांना हायपरटेन्शन, डायबिटीसचा त्रास आधीच सुरू झालेला असतो. अशा व्यक्तींनी चाळीशीनंतर जास्त सावधानता बाळगायला हवी. अशा व्यक्तींनी त्यांच्या जीवनशैलीत काही बदल केले पाहिजेत. भविष्यात आणखी आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागू नये म्हणून त्यांनी जंकफूड टाळून पोषक आहाराचा समावेश त्यांच्या अन्नात करायला हवा. जेवणात जास्त तेल आणि मीठाचा वापर टाळा. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा जास्त वापर करावा. भरपूर पाणी पिऊन आपलं शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रय्तन करावा ज्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होऊन रक्तदाब आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका टळू शकतो. अनेक आजाराचं मूळ हे झोपेशी निगडीत आहे. त्यामुळे चाळीशीनंतर दररोज 8-9 तासांची शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा.
advertisement
हे सुद्धा वाचा : Health Tips: चाळीशी आलीये, बिनधास्त राहा; फॉलो करा ‘या’ टिप्स, आजारपण पळेल दूर
शरीरात होतात ‘हे’ बदल
आरोग्य तज्ञांच्या मते, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरूषांमध्ये शारीरिक तसेच मानसिक बदल दिसून येतात. या वयात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होऊ शकतं. ज्यामुळे नैराश्य, चिडचिडेपणा, लैंगिक इच्छा कमी होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. तर महिलांमध्ये थॉयरॉई,रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागतात. यामुळे त्यांनाही रक्तदाबाचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यांच्याही मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. याशिवाय, वाढत्या वयानुसार स्त्री आणि पुरूष या दोघांच्याही स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.
‘अशी’ घ्या काळजी
वयाच्या चाळीशीनंतर नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर वर्षातून किमान 2 वेळा HbA1c ही तपासणी आणि 2 किंवा 3 महिन्याने रक्तातल्या साखरेची चाचणी करणं महत्त्वाचं ठरतं. वर्षातून किमान एकदा तरी संपूर्ण आरोग्याची चाचणी करणं हे अनिवार्य आहे. गेल्या काही वर्षात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे महिलांनी स्तनाच्या कर्करोगाची चाचणी करणं हे फार महत्त्वाचं ठरतं.
नियमित व्यायाम ठरू शकतो फायद्याचा
असं म्हणतात व्यायामाने शरीराला अनेक फायदे होतात. तरूणपणी धावणं, पोहणं किंवा जीममध्ये जाऊन व्यायाम करणं अनेकांना शक्य होतं. मात्र चाळीशीनंतर हे व्यायामाचे प्रकार सगळ्यांनाच जमतील असं नाहीत. त्यामुळे चाळीशीनंतर ज्यांना शक्य होईल त्यांनीच जीममध्ये जाऊन व्यायाम करावा. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय चाळीशीनंतर वजन उचलण्यासारखे कठीण व्यायाम करण्यापेक्षा चालणं, योगासनं, सूर्यनमस्कार असे साधे मात्र परिणामकारक व्यायाम करावेत.