मुंबई : अवेळी जेवण, अपूर्ण झोप, अशा धावपळीच्या आयुष्यात सध्या एवढे आजार निर्माण झाले आहेत की, आपण त्याने ग्रासले आहोत हे आपल्याला कळतही नाही. 'बायपोलर डिसऑर्डर' हा शब्द आपण कदाचित पहिल्यांदाच ऐकत असाल पण या मानसिक आजाराने आज हजारो लोकांना घेरलंय. या आजारातून स्वत: गेलेल्या मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर अंजली गोकर्ण याबाबत काय सांगतात पाहूया. त्यांच्या मुलावरही सध्या बायपोलर डिसऑर्डरचे उपचार सुरू आहेत.
advertisement
डॉ. अंजली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद आणि गंभीर उदासिनता अशा भावनांच्या मध्ये एखाद्या व्यक्तीची मानसिक अवस्था असेल तर ती बायपोलर डिसॉर्डरने ग्रस्त असते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हा एक मूड डिसऑर्डर आहे. सतत मूड स्विंग्स होणं हा एक मानसिक आजार आहे. त्यातून सर्व कामांमध्ये अडथळे येतात, एखाद्याचं रोजचं जगणंच कठिण होऊन जातं. त्या व्यक्तीच्या सामाजिक, व्यवसायिक, शैक्षणिक जीवनात व्यत्यय येऊ शकतो. ती व्यक्ती डिप्रेशन आणि मॅनिया हे दोन्ही आजार अनुभवते. याचा प्रत्येक टप्पा काही तासांपासून काही आठवड्यांपर्यंत टिकतो.
हेही वाचा : केळ्याची साल फेकण्याआधी फायदे वाचा, ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज नाही पडणार!
बायपोलर डिसऑर्डरची लक्षणं काय?
कधीकधी खूप आनंद होतो. कधीकधी खूप उदास वाटतं. सतत भास होतात. निद्रानाश जडतो. ती व्यक्ती सतत अस्वस्थ असते. तिला इतरांशी बोलायला आवडत नाही. तिला कशातही रस वाटत नाही. तिला अधूनमधून मेनियाचे झटके येतात.
हेही वाचा : उन्हात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितलं नाजूक जागेचं रक्षण कसं करावं
बायपोलर डिसऑर्डरचं कारण काय?
याचं कोणतंही स्पष्ट कारण नाही. परंतु न्यूरोकेमिकल असंतुलन म्हणजेच मेंदूतील काही विशिष्ट रसायनांचं असंतुलन झाल्यास मूड स्विंग्स होतात. हा आजार अनुवंशिक असल्याचंही डॉक्टर सांगतात. तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतो. शिवाय, बिघडलेलं कौटुंबिक वातावरण, मद्यपान, इत्यादींमुळेही हा त्रास होऊ शकतो.
उपचार काय?
हा एक तीव्र मानसिक आजार असल्यामुळे त्यावर दीर्घकालीन उपचार पद्धती वापरली जाते. उपचारांची पहिली पायरी असते औषधं. त्यानंतर समुपदेशन केलं जातं.
दरम्यान, आपल्या देशात मानसिक आजारांवर फार बोललं जात नाही. एखाद्या व्यक्तीला हा आजार असेल तर कळणारही नाही. त्यामुळे वर दिलेल्या लक्षणांपैकी कोणतंही लक्षण जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मुळात मानसिक आजारांबद्दल मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. तरच त्यांचं लवकर निदान होईल आणि योग्य उपचार सुरू करता येतील. त्यामुळे रुग्ण पुन्हा एकदा सामान्य आयुष्य जगू शकेल, असं डॉक्टर अंजली गोकर्ण यांनी सांगितलं.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा