काही कारणांमुळे पोटात गडबड झाली, पोट खराब झालं की उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. मुलं, वृद्ध, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना विशेषतः याचा त्रास जाणवतो. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइटची कमतरता निर्माण होते. अशावेळी डॉक्टर औषधांबरोबरच ORS घेण्याचा सल्ला देतात.
जुलाब आणि उलट्यांमुळे शरीरात इलेक्ट्रोलाइटची कमतरता जाणवते. ही गरज लक्षात घेऊन, ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) लिहून दिलं जातं. पण, सध्या बाजारात बनावट किंवा रासायनिक-मिश्रित ओआरएस विकलं जात असल्याच्या अनेक बातम्या येतात म्हणून आरोग्य तज्ज्ञ फक्त डब्ल्यूएचओ-प्रमाणित ओआरएस खरेदी करण्याचा सल्ला देतात.
advertisement
Blood Pressure: उच्च रक्तदाबामुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, आतापासूनच बदला सवयी
गरज असते तेव्हा ओआरएस मिळेलच असं नाही, त्यामुळे हे प्रमाण लक्षात ठेवा. अशा वेळी, तुम्ही घरीच ओआरएस तयार करू शकता. जनरल फिजिशियन आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका सेहरावत यांनी एका इंस्टाग्राम व्हिडिओमधे याची सोपी पद्धत शेअर केली आहे.
घरी ओआरएस बनवण्यासाठी, सहा चमचे साखर, अर्धा चमचा मीठ आणि एक लीटर पाणी आवश्यक आहे. जास्त साखरेमुळे अतिसार वाढू शकतो आणि जास्त मीठ शरीराला आणखी हानी पोहोचवू शकते. त्यामुळे हे प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे.
Skin Care : हिवाळ्यासाठी सोप्या - सुटसुटित टिप्स, कोरडी त्वचा होईल मऊसूत
ओआरएस बनवण्याची पद्धत - सगळ्यात आधी हात चांगले धुवा. आता पाणी उकळवा आणि थंड होऊ द्या. एका स्वच्छ काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात एक लीटर उकळलेलं आणि थंड केलेलं पाणी भरा. भांडं पूर्णपणे वरपर्यंत भरणार नाही याची खात्री करा. सहा चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ घाला. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण नीट ढवळून घ्या. ओआरएस तयार आहे.
दिवसभरात अनेक वेळा ते कमी प्रमाणात प्या. उलट्या किंवा जुलाबाच्या बाबतीत ओआरएस सर्वात उपयुक्त मानलं जातं. उलट्या आणि जुलाबांमुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक खनिजं कमी होऊ शकतात. ओआरएसमुळे या कमतरता भरून काढण्यास मदत होते आणि शरीराला वेगानं ऊर्जा मिळते.
