वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, फळांना सामान्यत: उच्च-प्रथिनंयुक्त अन्न म्हणजेच हाय प्रोटिन फूड म्हणून मानलं जात नाही. मात्र काही फळं अशी आहे ज्यात प्रोटिन्स भरपूर प्रमाणात आहे. ज्यामुळे स्नायूंना ताकद मिळून वजन कमी करायला मदत होते.
जाणून घेऊयात कोणत्या फळांमध्ये प्रोटिन्स जास्त असतात.
advertisement
संत्री:
अमेरिकेन कृषी विभागाच्या मते, ज्या फळांमध्ये 1 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनं असतात ती फळं वजन कमी करण्यासाठी फायद्याची ठरू शकतात. लिंबूवर्गीय फळं किंवा संत्र्यांमध्ये 1.2 ग्रॅम प्रथिनं असतात. याशिवाय ही फळं व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर निरोगी राहायला मदत होते.
डाळिंब :
डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, फॅटी ॲसिडस् आणि अँटी-इंफ्लेमेटरी ॲसिड असतात, ज्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत होते. याशिवाय रक्तातलं खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल कमी करण्यातही डाळिंब महत्त्वांची भूमिका बजावतं. साधारण कप डाळिंबाच्या दाण्यांमध्ये 2.9 ग्रॅम प्रथिनं असतात, जी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायद्याची ठरतात.
फणस :
एका अहवालानुसार, फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर ब्लडप्रेशर आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा फणस फायद्याचं ठरू शकतं. फणसाला प्रथिनांची खाण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. साधारणपणे फणसाच्या 3 ते 4 गऱ्यांमध्ये 2.6 ग्रॅम प्रथिनं आढळून येतात. याशिवाय फणसात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि काही जीवनसत्त्वं आढळून येतात.
ब्लॅकबेरी :
1 कप कच्च्या ब्लॅकबेरीमध्ये 2 ग्रॅम प्रोटिन्स असतात. ब्लॅकबेरीज या अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात. यामुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण होतं आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
पेरू :
पेरूत असलेलं व्हिटॅमिन सी आणि फायबर्सचे फायदे आपल्याला माहितीच आहेत. मात्र यासोबतच पेरूत मोठ्या प्रमाणात प्रथिनं म्हणजेच प्रोटिन्स आढळून येतात. साधारण एक कप आकाराच्या पेरूत 4.2 ग्रॅम प्रथिने आणि 9 ग्रॅम फायबर आढळून येतात.
जर्दाळू :
प्रोटिन्सच्या बाबतीत जर्दाळूला आश्चर्यकारक सुकामेवा म्हणता येईल. जेव्हा जर्दाळू हे कच्च किंवा फळाच्या रूपात असतं तेव्हा त्यात सुमारे 2.3 ग्रॅम प्रथिनं असतात. मात्र, जेव्हा जर्दाळू वाळवलं जाते तेव्हा प्रथिनाचं प्रमाण वाढून ते साधारण 4.4 ग्रॅम पर्यंत पोहचतं.
मनुके :
सुकामेव्याचा एक भाग असलेला मनुका हा द्राक्षांपासून बनतो हे आपण सगळेच जाणतो. साधारणपणे 100 ग्रॅम मनुक्यात 3.1 ग्रॅम प्रोटीन आढळून येतं. मनुक्यात असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मनुके फायद्याचे ठरतात.