डॉ. सुनीता यांच्या मते, 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच गरोदर राहणाऱ्या महिलांना ‘एल्डरली प्रायमी’ म्हणतात आणि या वयोगटातील गर्भधारणा उच्च जोखमीची असते. या काळात केवळ आईसाठीच नाही तर बाळासाठीही काही गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. 40 वर्षांनंतर गरोदरपणात हाय ब्लड प्रेशर, गेस्टेशनल डायबिटीज आणि सी-सेक्शन डिलिव्हरीचं प्रमाण वाढतं. जोखीम ही फक्त वयावर नाही तर ती महिला पहिल्यांदा आई होतेय की दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा, यावरही अवलंबून असते.
advertisement
डॉ. मित्तल सांगतात की, जर एखादी स्त्री पहिल्यांदाच 40 च्या आसपासच्या वयात आई होत असेल, तर तिच्यासाठी ही वेळ अधिक आव्हानात्मक ठरते. गरोदरपणाच्या काळात काही आरोग्य समस्या, ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा वजन वाढ झाल्यास नॉर्मल डिलिव्हरी कठीण होऊ शकते. पण जर सर्व पॅरामिटर्स म्हणजेच बाळाचं वजन, आईचं आरोग्य आणि ब्लड प्रेशर सामान्य असेल, तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्मल डिलिव्हरी शक्य असते.
जर महिला दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेस या वयात आई होत असेल, तर परिस्थिती तुलनेने सोपी असू शकते. पहिलं मूल नॉर्मल पद्धतीने झालं असेल आणि आरोग्य चांगलं असेल, तर दुसरं मूलही नॉर्मल डिलिव्हरीने होण्याची शक्यता जास्त असते. मात्र चौथ्या किंवा पाचव्या वेळेस गर्भधारणा केल्यास धोके अधिक वाढतात. अशा वेळी आई आणि बाळ दोघांनाही आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात तसेच डिलिव्हरीनंतर शरीर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.
डॉ. सुनीता यांचं म्हणणं आहे की, मातृत्वाचा निर्णय शक्यतो 30-35 वर्षांच्या दरम्यान घ्यावा. या काळात शरीर सर्वाधिक फर्टाइल असतं आणि डिलिव्हरीची शक्यता नैसर्गिकरीत्या जास्त असते. या वयात गुंतागुंतींचं प्रमाणही कमी असतं आणि आईचं शरीर नव्या जीवासाठी अधिक तयार असतं.
सध्या कॅटरीना कैफ आणि विक्की कौशल यांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचं स्वागत केलं आहे, पण त्यांची डिलिव्हरी नॉर्मल होती की सी-सेक्शन, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या उदाहरणाच्या निमित्ताने 40 वर्षांच्या आसपासच्या वयात मातृत्व घेणाऱ्या महिलांसाठी तज्ज्ञांनी दिलेलं हे मार्गदर्शन नक्कीच महत्त्वाचं आहे.
