नागपूरला संत्री ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. नागपूरचा उल्लेख ऑरेंज सिटी असा देखील केला जातो. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना संत्री हे भारतातलं किंवा नागपुरातलं फळ आहे असं वाटू शकतं. मात्र संत्र्यांची उत्पत्ती ही प्रामुख्याने दक्षिण आशियामध्ये झाली आहे. संत्री हे एक नैसर्गिक फळ आहे. संत्र्याचे माल्टा, नागपुरी संत्री असे विविध प्रकार आहेत. तर टँजरिन किंवा किन्नो है नैसर्गिक फळ नसून ते संकरित फळ आहे. 20व्या शतकात अमेरिकेत संत्री, एक लिंबूवर्गीय फळ आणि विलो लीफ मँडरिन यांच्या संकरित मिश्रणाने हे फळ तयार करण्यात आलं होतं. मात्र आता हे फळ सर्रासपणे भारतात विशेषतः पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित केलं जातं.
advertisement
साल आणि रंगावरून ओळखा संत्री आणि किन्नो
किन्नोपेक्षा संत्री या आकाराने थोड्या लहान आणि गोल असतात. त्याचा रंग हलका किंवा पिवळसर नारिंगी असतो. संत्र्याची साल ही थोडी गुळगुळीत आणि पातळ असते. तर किन्नो हे संत्र्यापेक्षा आकाराने थोडं मोठं आणि चपटं असते. त्याचा रंग गडद नारिंगी असतो. किन्नोची साल ही संत्र्यापेक्षा थोडी जाड आणि किंचित खडबडीत असते. संत्र्याची साल पातळ असल्यामुळे ती हाताने थेट सोलणं थोडं कठीण असतं. संत्र्यामध्ये बियांचं प्रमाण हे कमी असतं. तर दुसरीकडे, किन्नोची साल जाड आणि सैल असल्यामुळे ती हाताने सहज सोलता येते. किन्नोमध्ये मोठ्या प्रमाणात बिया असतात. संत्रं हे नैसर्गिक फळ असल्यामुळे त्याची थोडी आंबट- गोड असते. तर किन्नो हे चवीला गोड असतात आणि त्यात संत्र्यापेक्षा कमी आम्लता असते.
संत्री की किन्नो अधिक फायद्याचं कोणतं फळ ?
संत्री आणि किन्नो दोन्ही फळं ही ‘व्हिटॅमिन सी’ने समृद्ध असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. तथापि, संत्र्यांपेक्षा किन्नोमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर संत्री हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. किन्नोच्या तुलनेत संत्र्यांमध्ये कमी साखर आणि जास्त फायबर असतं. तर किन्नोत असलेल्या साखरेमुळे ते खाल्ल्याने शरीराला जलद ऊर्जा मिळते. त्यामुळे व्यायामानंतर थकवा येऊ नये म्हणून किंवा अंगदुखीच्या त्रासावर किन्नो खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. मात्र डायबिटीसचा त्रास असणाऱ्यांनी किन्नो खाणं टाळावं.
