जाणून घेऊयात या आगळ्यावेगळ्या दुधाविषयी.
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतात. कारण या नारळाच्या झाडापासून बनलेली एकही गोष्ट फुकट जात नाही. नारळातल्या खोबऱ्याचा वापर जेवणात सर्रासपणे होतो. अनेक देवळांमध्ये प्रसाद म्हणूनही खोबरं दिलं जातं. याशिवाय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली सोलकढी ही नारळापासूनच किंबहुना नारळाच्या दुधापासूनच बनते. म्हणून नारळ पाणी किंवा खोबरं खाण्यासोबतच नारळाचं दूध काढून प्यायलं तर ते जास्त फायद्याचं ठरतं.
advertisement
नारळाच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे
नारळाचं दूध आरोग्यासाठी खूप फायद्याचं आहे. नारळाचं दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे विविध प्रकारांच्या आजारांपासून आपल्या शरीराचं रक्षण होतं. याशिवाय नारळाच्या दुधात असलेल्या विविध पोषकतत्वांमुळे वजन कमी करण्यासाठी आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी ही नारळाचं दूध फायद्याचं ठरू शकतं. जाणून घेऊयात नारळ्याच्या दुधाचे फायदे आणि नारळाचं दूध प्यायल्याने कोणत्या आजारांना दूर ठेवता येऊ शकतं ते .
दंतविकारांवर गुणकारी :
असं म्हटलं जातं की, ज्याचे दात स्वच्छ ती व्यक्ती निरोगी. मात्र अनेक जण दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना विविध दंतविकार, तोंडाच्या अल्सरचा सामना करावा लागतो. नारळाचं दूध प्यायल्याने अल्सर आणि अन्य दंतविकार दूर व्हायला मदत होते.
पचनासाठी फायदेशीर :
नारळाच्या दुधात असलेल्या विविध पोषकतत्त्वांमुळे अन्न लवकर पचायला मदत होते. म्हणूनच अनेक जण जेवणानंतर नारळाच्या दुधापासून बनवलेली सोलकढी पितात. त्यामुळे ज्यांना अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशांनी नारळाचं दूध प्यायल्यास त्यांचे पचनाचे त्रास दूर होऊ शकतात.
संसर्गापासून बचाव:
आहारतज्ञांच्या मते, नारळाच्या दुधात अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून विविध संक्रामित आजारांपासून शरीराचं रक्षण होतं.
स्थूलपणा कमी होतो :
ज्यांना ओबेसिटी किंवा स्थूलपणाचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी नारळाचं दूध हे वरदान मानलं जातं. नारळाच्या दुधात असलेल्या विशिष्ट फॅटी ॲसिड्समुळे अन्न पचायला तर मदत होतेच मात्र त्यासोबत अतिरिक्त फॅट्स बर्न होऊन वजन कमी व्हायला मदत होते. त्यामुळे लठ्ठपणा किंवा स्थूलपणा कमी व्हायला मदत होते.
डायबिटीस :
नारळाच्या दुधामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो. शिवाय ज्यांना डायबिटीस झाला असेल अश व्यक्तींची रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यातही नारळाचं दूध फायद्याचं ठरतं. मात्र डायिबिटीस हा एक गंभीर आजार असल्याने नारळ्याच्या दुधाचं सेवन करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
हे सुद्धा वाचा : Vegan Milk: व्हेगन मिल्क म्हणजे काय? कशापासून आणि कसं बनवू शकता?
त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याचं:
कोमल, मुलायम आणि तजेलदार त्वचेसाठी शरीरात आणि त्वचेत आर्द्रता असणं गरजेचं आहे. नारळाच्या दुधाच्या वापराने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. नारळाच्या दुधातल्या मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी नारळाचं दूध हे फायद्याचं ठरू शकतं.