रक्तदान करणे हे एक अतिशय चांगले काम आहे, जे एखाद्याचा जीव वाचवू शकते. मात्र पीरियड्सदरम्यान महिलांनी रक्तदान करावे की नाही, याबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे. काही जण म्हणतात की, या काळात रक्तदान करता येते, तर काही जण म्हणतात की पीरियड्समध्ये रक्तदान करू नये. या गोंधळामुळे अनेक महिला रक्तदान करण्यापासून मागे हटतात.
advertisement
पण प्रत्यक्षात डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पीरियड्सदरम्यान रक्तदान करण्यात कोणतीही अडचण नाही. याबाबत बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी येथील किम्स रुग्णालयातील प्रसूती व फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. लावण्या किरण यांनी काय खरे आहे आणि काय चुकीचे आहे, हे खाली सविस्तर समजावून सांगितले आहे.
मिथक 1 : पीरियड्सदरम्यान रक्तदान करणे धोकादायक आहे. त्यामुळे शरीर कमकुवत होते.
सत्य : पीरियड्सदरम्यान महिलांचे सरासरी फक्त 30 ते 80 मिली रक्त जाते, तर रक्तदान करताना सुमारे 500 मिली रक्त घेतले जाते. शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य असल्यास, निरोगी शरीर ही रक्ताची कमतरता लवकर भरून काढते.
मिथक 2 : पीरियड्सचे रक्त दान केलेल्या रक्ताला खराब करते.
सत्य : रक्तदान करताना रक्त गर्भाशयातून नाही, तर रक्तवाहिन्यांतून घेतले जाते. त्यामुळे पीरियड्सचे रक्त, दान केलेल्या रक्तावर कोणताही परिणाम करत नाही.
मिथक 3 : पीरियड्सच्या काळात रक्तदान केंद्रे रक्त घेत नाहीत.
सत्य : पीरियड्समुळे कोणतेही रक्तदान केंद्र रक्तदान करण्यास नकार देत नाही. रक्तदान करायचे की नाही, हे तुमच्या हिमोग्लोबिनच्या पातळीवर आणि तुमच्या आरोग्यावर अवलंबून असते, महिलांच्या पीरियड्सवर नाही.
मिथक 4 : रक्तदान केल्याने पीरियड्सचा त्रास वाढतो किंवा रक्ताची कमतरता होते.
सत्य : ज्या महिलांना खूप जास्त रक्तस्राव होतो किंवा खूप कमजोरी वाटते, त्यांनी आपल्या आरोग्याची स्थिती पाहून रक्तदान पुढे ढकलावे. ज्यांचा रक्तस्राव नॉर्मल किंवा मध्यम असतो, त्यांना सहसा काही त्रास होत नाही. रक्तदानानंतर पुरेसे पाणी पिणे आणि आयर्नयुक्त आहार घेतल्यास लवकर रिकव्हरी होते.
मिथक 5 : पीरियड्स संपेपर्यंत थांबणे आवश्यक आहे.
सत्य : पीरियड्स संपल्यानंतरच रक्तदान करावे अशी काही गरज नाही. तुम्ही पीरियड्सदरम्यान किंवा ते संपताचही रक्तदान करू शकता. जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल तर काही दिवसांसाठी रक्तदान पुढे ढकलू शकता, पण ते बंधनकारक नाही.
अशा वैज्ञानिक बाबी समजून घेतल्यास महिलांना कोणताही भीती न बाळगता रक्तदानासाठी पुढे येता येईल. तसेच पर्यावरणाच्या संरक्षणाचा विचार करता डॉक्टर पीरियड कप आणि कापडी सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचा सल्ला देतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
