वातावरण बदल आणि डासांची उत्पत्ती :
जसं जसं वातावरण बदलतं तसतसं डासांच्या उत्पत्तीचं प्रमाणही वाढत जातं. डासांमुळे फक्त झोपेवरच परिणाम नाही होत तर डास चावल्यामुळे बऱ्याचदा मलेरिया, डेंग्यू सारख्या जीवघेण्या आजारांनाही सामोरं जावं लागतं. डासांपासून सुटका करून घेण्यासाठी अगरबत्ती, मच्छरदाणी, कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र या कीटकनाशकात असलेल्या धोकादायक रसायनांमुळे आरोग्याला धोके निर्माण होऊ शकतात. याशिवाय ज्यांना दमा, अस्थमा किंवा विविध श्वसनविकार आहेत अशा व्यक्तींसाठी मॉस्किटो रिपेलंटसुद्धा डोकेदुखीचे ठरतात. त्यामुळे तुम्हालाही डासांच्या उपद्रवाचा सामना करावा लागत असेल तर आम्ही सांगतो त्या 2 सोप्या घरगुती पर्यायांचा वापर करून डासांच्या त्रासापासून सुटका करून घेऊ शकता.
advertisement
उपाय 1 :
लिंबू, लवंग, कापराचा दिवा :
डासांना पळवून लावण्यासाठी कापूर आणि लिंबू हे प्रचंड फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळे तुम्हाला डासांपासून सुटका हवी असेल तर एक विशेष दिवा बनवावा लागेल. यासाठी आधी एक मोठा लिंबू घेऊन त्याला मधोमध कापून त्याचे 2 तुकडे करून घ्या. त्यानंतर लिंबाचा गर काढून टाकून किंवा लिंबू पिळून त्यातला रस आणि आतला भाग काढून फेकून द्या. आता या लिंबात मोहरीचं तेल, लवंग, कापूर टाका. वात बनवून हा लिंबाचा दिवा पेटवा. लिंबू, लवंग, कापूर, यांच्या वासाने घरातले डास बाहेर पळून जातील.
उपाय 2 :
कॉफी पावडर, टूथपेस्ट, लवंग आणि टिश्यू पेपरची वात :
हा प्रकार थोडा किचकट आणि त्रासदायक ठरू शकतो. आधी एका टिश्यूपेपरवर कॉफी पावडर टाका. आता त्यावर काही लवंगा ठेवा. यानंतर, एका कापसाच्या वातीप्रमाणे पेपर गुंडाळा. त्यानंतर या पेपरच्या वातीवर थोडी टूथपेस्ट टाका. तयार झालेली ही वात सांभाळूनपणे पेटवा. लवंग आणि कॉफीच्या वासाने मच्छर पळून जातील.
हे साधे घरगुती उपाय केल्याने तुम्हाला डासांच्या त्रासापासून सुटका मिळून तुम्ही रात्री शांत झोपू शकता.