जाणून घेऊयात संत्री खाण्याचे फायदे.
आजकाल बाजारात भरपूर संत्री उपलब्ध आहेत. आबंट गोड संत्री सगळ्यांच आवडतात. संत्रं हे फळ फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायद्याचं मानलं जातं. रंजना न्यूट्रिग्लो क्लिनिकच्या संस्थापक आणि आहारतज्ज्ञ रंजना सिंह यांनी न्यूज18 ला सांगितलं की, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्ही रोज एक संत्रं खालं तर तुम्हाला भरपूर आरोग्यदायी फायदे होतील.
advertisement
रोगप्रतिकारक शक्ती वाढते :
संत्र्यात असलेल्या ‘व्हिटॅमीन सी’मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे वातावरण बदलामुळे होणाऱ्या सर्दी, खोकला, याशिवाय अनेक प्रकारच्या विषाणूजन्य आणि बॅक्टेरियाजन्य आजाराच्या संसर्गाचा धोका कमी करता येतो. संत्र्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण करतात. याशिवाय त्वचेलाही निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. त्यामुळे संत्री खाल्ल्याने विविध त्वचारोगांपासूनही दिलासा मिळू शकतो.
विविध आजारांवर गुणकारी संत्री :
संत्र्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. फायबर्समुळे पचनसंस्था निरोगी राहण्यात मदत होते. यामुळे गॅसेस, बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या दूर होतात. संत्री खाल्ल्याने पोट स्वच्छ आतून स्वच्छ राहतं आणि आतड्यांचं आरोग्यही सुधारायला मदत होते. संत्र्यांच्या नियमित सेवनाने पोटफुगी आणि ॲसिडिटीसारख्या समस्याही कमी होतात. याशिवाय,संत्र्यांत आढळणाऱ्य़ा पोटॅशियम आणि फायबर्स रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे नियमितपणे संत्र्याचं सेवन करणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरतं.
वजन कमी करण्यासाठी फायद्याचं :
ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी संत्री एक उत्तम पर्याय आहे. संत्र्यात कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर असतं. फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे अतिरिक्त भूक लागत नाही. याशिवाय संत्र्यामुळे चयापचय सुधारल्याने अतिरिक्त कॅलरीज बर्न व्हायला मदत होते.
डायबिटीसच्या रूग्णांसाठी वरदान :
जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायबिटीसची लागण होते, तेव्हा त्या व्यक्तीच्या आहारावर अनेक निर्बंध येतात आणि जेव्हा डायबिटीसचं प्रमाण वाढतं तेव्हा तर अशा व्यक्तींना फळं सुद्धा खाता येत नाहीत. मात्र संत्री याला अपवाद ठरतात. कारण संत्र्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. त्यामुळे संत्री खाल्ल्यानंतर रक्तात साखर हळूहळू सोडली जाते. यामुळे शरीरातली इन्सुलिनची पातळी सुद्धा नियंत्रित होते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात संत्र्याचा समावेश करू शकतात.