हे जादुई फळ आहे तरी काय ?
पावसाळ्यात येणारं कृष्णकमळाचं फूल आपल्या सगळ्यांच माहिती आहे. आकर्षक तितकंच सुगंधी असणाऱ्या या फुलाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. जगभरात या फुलाच्या जवळपास 500 पेक्षा जाती आढळून येतात. याच झाडाला जे फळ येतं, त्याला कृष्णा फळ किंवा पॅशन फ्रूट म्हणून ओळखलं जातं. हेच कृष्णा फळ डायबिटीसचा कर्दनकाळ म्हणून ओळखलं जातं. कारण कृष्णा फळात कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, ए, डी, के, ई, लोह, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक पोषक तत्वं आढळतात. ही पोषकतत्वे आपल्या फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील खूप फायद्याची आहेत.
advertisement
कसं आहे कृष्णा फळ ?
कृष्णा फळ हे मुळचं ब्राझील मधलं फळ आहे. त्यामुळे अनेक भारतीयांना या फळाबाबत फार माहिती नाहीये. जगातल्या अनेक देशांमध्ये त्याची लागवड केली जाते आहे. भारतात नागालँड, केरळ, कर्नाटक, मिझोराम आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये कृष्णा फळाचं भरपूर उत्पादन घेतलं जातं. महाराष्ट्रातही पुणे, जालना, सातारा अशा शहरातल्या शेतकऱ्यांनी कृष्णा फळाची लागवड करायला सुरूवात केलीये. कृष्णा फळ हे चवीला गोड-आंबट असतं. या फळात भरपूर बिया आणि गर असतो. फुलांप्रमाणे या फळाच्या देखील 500च्या आसपास प्रजाती आहेत. हे फळ खाल्ल्याने फक्त रक्तातली साखरच कमी होत नाही तर, लठ्ठपणाही कमी व्हायला मदत होते.
जाणून घेऊयात कृष्णा फळ / पॅशन फ्रुटचे फायदे
डायबिटीस नियंत्रणात :
पॅशन फ्रूट किंवा कृष्णा फळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे हे फळ खाल्ल्याने रक्तात साखर हळू हळू सोडली जाते. याशिवाय यामध्ये फायबरही मुबलक प्रमाणात असते.त्यामुळे अन्न पचायला मदत होतो. शरीरातल्या इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यातही कृष्णा फळ मदत करतं.
हृदयासाठी चांगलं :
पॅशन फ्रूटमध्ये पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. यामुळे हृदय निरोगी राहते. याशिवाय यामध्ये असलेले फायबर चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. या फळाच्या बियांमध्ये अशी संयुगं असतात जी रक्ताभिसरण वाढवायला मदत करतात. यामध्ये असलेले पिसेटानॉल और स्किरपुसिन बी हृदयरोगांना दूर ठेवायला मदत करतात.
वजन नियंत्रित होतं :
पॅशन फ्रूट खाल्ल्याने वजन नियंत्रित ठेवता येते. यामध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असतं. हे फळ खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे भूक कमी होते. पॅशन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बीटा कॅरोटीनसारखे पोषक घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. कृष्णा फळ खाल्ल्याने चयापचय क्रिया वाढून अन्न पचायला मदत होते आणि वजन नियंत्रणात राहतं.