कधीतरी पावसात भिजणं ही गंमत असली तरी त्यानंतर होणारे त्रास पाहाता पावसात भिजणं नकोच वाटतं. केसंमध्ये खाज येणं, बुरशीजन्य संसर्ग, केस गळणं असे अनेक त्रास होतात. ते दूर करण्यासाठी काही गोष्टींचा वापर उपयुक्त ठरतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे ॲलोव्हेरा अर्थात कोरफड जेल. कोरफड जेल केसांच्या मुळांशी लावल्यास मऊपणा येतो. त्यामुळे खाज आणि सूज अशा तक्रारी असतील तर त्या कमी होतात. कोरफडीचं पान उभं कापून त्याच्यामधील गर म्हणजेच जेलसारखा भाग डोक्याला लावल्यास उपयोग होतो. त्याबरोबरच बाजारात अनेक प्रकारचे ॲलोव्हेरा जेल मिळतात. त्यांचा वापरही करता येतो. हे जेल लावल्यानंतर अर्ध्या तासाने शाम्पू लावून केस धुवावेत.
advertisement
Kitchen Hacks : 14 दिवस केळी राहतील ताजी, तांदळाला नाही लागणार कीड, वापरा फक्त 3 किचन टिप्स
टी ट्री ऑईलही केसांसाठी अत्यंत परिणामकारक असतं. खोबरेल किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये या तेलाचे काही थेंब मिसळून मालिश केल्यास उपयोग होतो. हे तेल रात्रभर ठेवा किंवा किमान अर्धा तास ठेवा. त्यानंतर शाम्पूने केस धुवा. ॲपल सीडर व्हिनेगर डोक्याच्या त्वचेचा पीएच संतुलित करायला मदत करतं. त्यातील रोगजंतूरोधक गुणांमुळे खाज कमी होते. एका स्प्रे असलेल्या बाटलीत पाणी आणि ॲपल सीडर व्हिनेगरचं मिश्रण भरा. हे मिश्रण आपल्या केसांच्या मुळांशी स्प्रे करा. त्यानंतर 15-20 मिनिटांनी केस धुवा. कडुनिंबाची पानं 15 मिनिटं पाण्यात उकळवून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या.
शाम्पू लावल्यानंतर या पाण्याने केस धुवा. त्यामुळे डोक्याला येणारी खाज कमी होईल. दही हे उत्तम प्रोबायोटिक्स असतं. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला थंडावा मिळतो. त्यात लिंबू मिसळल्यास केसांतून सुटणारं तेल नियंत्रित होतं. अर्धा तास हे मिश्रण लावून ठेवा आणि शाम्पूने धुवा. केसांसाठी कांद्याचा रसही गुणकारी ठरतो. कांदा मिक्सरवर वाटून त्याचा रस कापसाच्या बोळ्याने केसांच्या मुळांशी लावावा. त्यानंतर अर्ध्या तासाने शाम्पूने केस धुवावेत. खोबरेल तेल हे एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. त्यात मध मिसळून केसांना लावल्यास डोक्याच्या त्वचेची खाज कमी होते. दोन चमचे खोबरेल तेल आणि एक मोठा चमचा मध यांचं मिश्रण करुन ते केसांच्या त्वचेवर लावून अर्ध्या तासाने केस धुतले असता केसांची खाज कमी होण्यास मदत होऊ शकते.