आजच्या काळात इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅटसारख्या प्लॅटफॉर्मवर दिसणारे परफेक्ट फिल्टर केलेले चेहरे, उभरे गाल, शार्प जॉलाइन यामुळे तरुणांमध्ये स्वतःच्या दिसण्याबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. आकर्षक दिसण्याची स्पर्धा इतकी तीव्र झाली आहे की अनेक मुली आयडल फेस मिळवण्यासाठी सर्जरीचा पर्याय निवडतात. रिल्स, फोटोशूट आणि सोशल मीडिया फॉलोअर्स मिळवण्यासाठी देखील परफेक्ट लूक महत्त्वाचा ठरत आहे. यामुळे बाह्य सौंदर्याच्या नावाखाली आर्थिक गुंतवणूक वाढत असून तरुणी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मोठे बदल स्वेच्छेने करून घेत आहेत.
advertisement
कॉस्मेटिक सर्जरी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पूर्वी जे उपचार वयाच्या उत्तरार्धात केले जात, तेच आता कॉलेज वर्किंग तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र दिसते. कमी वेळेत उपलब्ध होणारे, कमी खर्चिक उपचार आणि त्वरित परिणाम हे तरुणांना आकर्षित करणारी प्रमुख कारणे आहेत.
अनेक मुलींमध्ये असा समज वाढत आहे की अभिनय, मॉडेलिंग किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात संधी मिळण्यासाठी आकर्षक दिसणे गरजेचे आहे. सौंदर्याच्या मापदंडांशी जुळवून घेण्यासाठी सर्जरी हा एक शॉर्टकट ठरतो, असे अनेक तरुणींचे मत आहे. काही प्रकरणांमध्ये नोकरी, जाहिराती, इव्हेंट मॉडेलिंग यांत सौंदर्याला प्राधान्य दिले जाते, ही भावना तरुणांना सर्जरीकडे नेते.
फक्त महिलाच नाही तर पुरुषांमध्येही या विषयी जागरूकता वेगाने वाढत आहे. केशप्रतारोपण, बॅरिएट्रिक सर्जरी, वजन कमी केल्यानंतर त्वचेचा टाईटेनिंग, नॅनो-प्लास्टी यांसारख्या सर्जरींचा कल पुरुषांमध्येही वाढत आहे. पुरुषांनाही स्क्रीनवर किंवा सोशल मीडियावर नीटनेटके दिसण्याची इच्छा असल्याने हे उपचार ची आता क्रेज येत आहेत.
तळेगाव येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. सोमनाथ वाय. कराड यांचे म्हणणे आहे, कॉस्मेटिक सर्जरी करताना केवळ ट्रेंड पाहून निर्णय घेऊ नये. अशा सर्जरी अनुभवी आणि बोर्ड-प्रमाणित सर्जनकडूनच केल्या गेल्या पाहिजेत. कोणतीही प्रक्रिया शरीरात कायमस्वरूपी बदल घडवू शकते, त्यामुळे योग्य मार्गदर्शन, शास्त्रीय माहिती आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे.
सौंदर्यावर खर्च होणारी लाखोंची रक्कम, मानसिक दबाव, इतरांच्या अपेक्षांना पुरून उरण्याची धडपड या सगळ्यांच्या पलीकडे स्वतःला स्वीकारण्याची गरज अधिक आहे, असे तज्ज्ञ सांगतात. परंतु सोशल मीडियाच्या ट्रेंडने प्रभावित झालेली तरुण पिढी सौंदर्याच्या स्पर्धेत स्वतःला अधिकाधिक बदलण्याच्या दिशेने धावत असल्याचे दिसते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.