सांगली: दिवाळीच्या संपूर्ण फराळापैकी चिवडा हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा पदार्थ असतो. अनेक सुगरणी दिवाळीच्या फराळामध्ये दोन ते तीन प्रकारचे चिवडे बनवतात. चिवडा बनवण्याच्या अनेक पद्धती आपल्याकडे आहेत. आज आपण सांगलीच्या सुगरणींनी बनवलेली चिवड्याची खास रेसिपी पाहणार आहोत. खमंग आणि कुरकुरीत अशी चिवड्याची रेसिपी सांगलीच्या प्रसिद्ध उद्योजिका शोभा पाटील यांनी सांगितली आहे.
advertisement
चिवडा बनवण्यासाठी साहित्य
एक किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य अगदी योग्य प्रमाणात घेणं गरजेचं असतं. चिवडा बनवण्यासाठी भाजके पोहे (1 किलो), मका चिवडा (अर्धा किलो), शेंगदाणे (अर्धा किलो), फुटाणे डाळ (अर्धा किलो), मोहरी (2 चमचे), जिरे (2 चमचे), बारीक मीठ (3 चमचे), हिंग पावडर (1 चमचा), हळद (1 चमचा), लाल तिखट (4 चमचे), चिवडा मसाला (100 ग्रॅम) हे साहित्य आवश्यक आहे. तसेच लसूण, कडीपत्ता, पिठी साखर हे आवडीनुसार प्रमाण घ्यावे.
दिवाळीत लक्ष्मीपूजन कधी करावे ? जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजा पद्धत
चिवडा बनवण्याची कृती
स्वच्छ करून घेतलेले भाजके पोहे मोठ्या भांड्यात घ्यावेत. ते कढईमध्ये गरम करावे. उकळलेल्या तेलात मका चिवडा तळून घ्यावा. भाजक्या पोह्यांवर मका चिवडा गरम गरम टाकावा. त्यानंतर शेंगदाणे, कढीपत्ता आणि लसुन तळून पोह्यांवर टाकावा.वरती दिलेल्या साहित्याप्रमाणे चना डाळ, हळद, लाल तिखट, हिंग पावडर, पिठीसाखर, चिवडा मसाला आणि बारीक मीठ टाकावे. उकळलेल्या तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन पोह्यांवरती तडका द्यावा. सर्व मिश्रण एकसारखे हलवून घ्यावे. अशाप्रकारे खमंग, खुसखुशीत चवदार चिवडा तयार होतो.
सांगली शहरातील सुप्रसिद्ध भडंगबद्दल सगळ्यांनाच माहिती असतं. सांगली बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाच्या आठवणीत सांगलीचा भडंग नेहमीसाठी राहते. अशाच खास पद्धतीचा खमंग आणि चवदार चिवडा देखील सांगलीमध्ये बनवला जातोय. असा खमंग चिवडा तुम्हीही बनवू शकता.