सांगली: गुढीपाडवा हा हिंदू वर्षातील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी दारोदारी गुढी उभारल्या जातात. मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यातील गुढीपाडव्याच्या सणाने होते. हा सण हिंदू नववर्षातील पहिला सण मानला जातो. नवीन वर्षाचे स्वागत अगदी जल्लोषात केले जाते. गुढी उभारण्यासाठी एका उंच काठीला रेशीम खणाचे वस्त्र बांधतात. त्यावर चांदीचा गडू उपडा ठेवून, कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, झेंडूचा हार आणि साखरेची माळ बांधतात. गुढीपाडव्याच्या दिवशी साखरेची माळ आणि कडुनिंबाच्या पानांना अधिक महत्त्व असते. तर रंगबेरंगी साखरेची माळ गुढीला लावून त्याची मनोभावे पूजा केली जाते.
advertisement
गुढीपाडव्याच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये वेगवेगळया प्रकारच्या गुढी, प्लास्टिकचे अन् झेंडूचे हार, वस्त्र, तांब्याचा गडू आपल्याला पाहायला मिळतो. तसेच साखरेच्या गाठीचे रंगबेरंगी प्रकार पाहायला मिळतात. अनेक आकर्षक आणि युनिक नक्षीकाम केलेले चित्र असलेल्या माळांची खरेदी केली जाते. साखरेची माळ बनवणे फार सोपे आहे. अनेकदा घाईगडबडीत आपण पूजेच्या सामानात साखरेची माळ घ्यायला विसरतो. आपण आपल्या आवडीनुसार शुभ्र पांढऱ्या किंवा विविध रंगांच्या, आकाराच्या साखरेच्या गाठी झटपट तयार करु शकतो. या पारंपरिक पद्धतीच्या गाठी कशा बनवायच्या याची अगदी सोपी रेसिपी लोकल18 च्या माध्यमातून पाहुयात.
Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ का खातात? तुम्हाला माहितीये का कारण?
साहित्य
साखर - 1 वाटी, पाणी - 1/2 वाटी, तूप 1 चमचा, खाण्याच रंग चिमूटभर आणि धागा (दोरा)
साखरेची माळ बनवण्याची कृती
सगळ्यात आधी आप्पे पात्राला तेल लावून ग्रीस करुन घ्या. यामध्ये धागा घालून ठेवा. आता एका पॅनमध्ये साखर घेऊन त्यात पाणी घालून चांगले उकळवून घ्या. एकतारी पाक तयार होईल. पाक घट्ट तयार झाल्यानंतर गॅस बंद करुन त्यात चमचाभर तूप आणि खाण्याचा रंग घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर हा पाक आप्पे पात्रात टाकून सेट होऊ द्या. थंड झाल्यानंतर साखरेची सुंदर माळ तयार होईल. अगदी सोप्या पद्धतीनं येत्या गुढीपाडवा सणासाठी घरच्या घरी ही माळ आपणही बनवू शकता.