डोंबिवली : थंडीत भाकरीसोबत किंवा रोजच्या जेवणात तोंडी लावणीसाठी ठेचा खाणारे बरेचजण असतात. ठेचा बनवणं सोपं असलं, तरी परफेक्ट चव येण्यासाठी ठेचा बनवण्याच्या काही ट्रिक्स माहीत असाव्या लागतात. ठेचा चवीला उत्तम, बनवायला सोपा असतो. कमीत कमी वेळातवेळा अस्सल गावरान पद्धतीचा ठेचा तयार कसा करायचा याचविषयीच रेसिपी आपल्याला डोंबिवलीमधील गृहिणी शोभा पोळ यांनी सांगितली आहे.
advertisement
ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, दोन चमचे तेल, 15 ते 20 लसूण पाकळ्या, दोन चमचे जीरे, कोथिंबीर, शेंगदाण्याचे कूट आणि चवीपुरतं मीठ हे साहित्य लागेल.
हिवाळ्यात बनवा विदर्भ स्पेशल पाण्यातील गोळे, एकदम आवडीने खाल, पाहा संपूर्ण रेसिपी VIDEO
ठेचा बनवण्याची कृती
सर्वप्रथम दहा ते पंधरा घेतलेल्या हिरव्या मिरच्या व्यवस्थित धुवून घ्या. त्यांचे देठ व्यवस्थित काढून घ्या. त्यानंतर एका कढईत तेल टाकून त्यामध्ये त्या सगळ्या मिरच्या व्यवस्थित भाजा. त्यामध्ये नंतर सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याची पाने टाकून पुन्हा व्यवस्थित मिश्रण भाजून घ्या. मिरच्यांचा रंग साधारण लालसर झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. भाजलेल्या मिरच्यांचे मिश्रण थंड करून घेतल्यावर त्या मिरच्या मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये मीठ आणि जिरे टाकून व्यवस्थित मिक्स करा. तिखट कमी हवं असेल तर या मिश्रणात शेंगदाण्याचे कूट टाका. आणि पुन्हा मिक्सर फिरवून घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर कांद्यासोबत हा झणझणीत मिरचीचा ठेचा खाऊ शकता.