शेवग्याच्या पानांमधल्या पोषणमूल्यांचा विचार केला तर ही भाजी किती पौष्टिक आहे हे आपल्या लक्षात येते. शेवग्याच्या शेंगा जितक्या चवदार लागतात तितकी भाजी चवदार लागत नाही. मात्र योग्य पद्धतीने बनवली तर कडू देखील लागत नाही. शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची पाहुयात.
शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी साहित्य
ओंजळभर शेवग्याची कोवळी ताजी पाने, ओल्या खोबऱ्याचे वाटण, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीप्रमाणे तेल, जिरे, मोहरी आणि मीठ हे साहित्य लागेल.
advertisement
शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी कृती
शेवग्याच्या पानांच्या भाजीसाठी शक्यतो ताजी, कोवळी पाने वापरावी. शेवग्याच्या छोट्या देठांसहित पाने खुडून, स्वच्छ धुवून घ्यावीत. नाजूक, कोवळी पाने असल्याने उकडून घेण्याची गरज नसते. कढईत तेल गरम करावे. जिरे, मोहरी, ओल्या खोबऱ्याचे वाटण, हिरव्या मिरचीचा ठेचा घालून चरचरीत फोडणी द्या. भाजलेल्या वाटणात भाजी टाकून घ्या. चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी टाकून भाजी शिजवून घ्यावी. भाजी बनवण्याच्या अनेक पद्धतींपैकी ही सगळ्यात सोपी आणि पारंपरिक पद्धत ठरते. पावसाळ्यातले संसर्ग टळावेत आणि तब्येत चांगली राहावी यासाठी तुम्ही देखील भरपूर पोषणमूल्यांचा खजिना असणारी शेवग्याच्या पानांची आवर्जून बनवून खा. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा गरम भातासोबत गरमागरम अगदी चवदार लागते.