अमरावती : विदर्भ हा झणझणीत पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. वर्षभर सुद्धा विदर्भात प्रत्येक सणावाराला काही तरी विशेष पदार्थ किंवा एखादी विशेष थाळी बनवली जाते. सध्या पौष महिना सुरू आहे. पौष महिन्यात विदर्भात आवर्जून बनवली जाणारी थाळी म्हणजे वाल्याच्या शेंगाची भाजी, मूगाची खिचडी आणि भाकरी किंवा पोळी. हिवाळ्यामध्ये वालाच्या शेंगा खूप पौष्टीक असतात. त्यामुळे डॉक्टर सुद्धा त्या खाण्याचा सल्ला देतात. विदर्भात पौष रविवारला मूगाची खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी हाच बेत बनवला जातो. तुम्ही एरवी सुद्धा बनवू शकता. वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची? याची रेसिपी आपल्याला अमरावतीमधील रसिका शेळके यांनी सांगितली आहे.
advertisement
वालाच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
वालाच्या शेंगा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, लसूण आणि मसाला पेस्ट, तेल, शेंगदाण्याचे कूट हे साहित्य लागेल.
झटपट बनवा नाश्त्यासाठी मुरमुरे पराठा, मुलं आवडीने खातील, पाहा रेसिपीचा सोपा Video
वालाच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी कृती
सर्वात आधी वालाच्या शेंगा मोडून घ्यायच्या. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या. भाजी बनवताना सर्वात आधी तेल टाकायचे. तेल थोडे गरम झाले की त्यात जिरे टाकायचे. जिरे तळतळले की त्यात कांदा टाकायचा आणि त्याला थोड लाल होऊ द्यायचं.
कांदा थोडा लालसर झाला की लसूण पेस्ट आणि इतर मसाले टाकून घ्यायचे. मसाले थोडे परतवून घ्यायचे आहे. तेल सोडतपर्यंत मसाले परतवून घेतले की त्यात टोमॅटो टाकायचे. टोमॅटो नरम होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे.
टोमॅटो नरम झाले की, वालाच्या शेंगा टाकून घ्यायच्या. त्यानंतर शेंगा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. या भाजीमध्ये पाणी घालायचे नाही. भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे. वाटत असल्यास अगदी थोडे पाणी तुम्ही टाकू शकता.
15 मिनिटानंतर भाजी शिजत आली असेल. त्यानंतर त्यात शेंगदाण्याचे कुट घालून ते मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर घालायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं. आणखी भाजीला 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं.
5 मिनिटानंतर भाजी खाण्यासाठी तयार होईल. ही भाजी मूगाची खिचडी किंवा पोळी, भाकरी सोबत अतिशय चविष्ट लागते. कोवळ्या शेंगा असतील तर भाजी आणखी छान तयार होते.