अमरावती : हिवाळा सुरू झाला न झाला विदर्भात अनेक नवनवीन पदार्थांची मेजवानी सुरू होते. ओल्या तुरीच्या शेंगा बाजारात आल्या की, विदर्भात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे ओल्या तुरीचे कढी गोळे. विदर्भातील फेमस पदार्थांपैकी एक म्हणजे हा पदार्थ. बनवायला थोडा वेळ घेतो. पण खायला एकदम चविष्ट लागतो. विदर्भात असे क्वचित लोकं असतील ज्यांना हा पदार्थ आवडत नसेल. झणझणीत आणि टेस्टी असे ओल्या तुरीचे कढी गोळे कसे बनवायचे? याचीच रेसिपी आपल्याला सारिका पापडकर यांनी सांगितली आहे.
advertisement
तुरीच्या दाण्याचे कढी गोळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तुरीचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कडी पत्ता, जिरे, मोहरी, हळद, मीठ, लसूण पेस्ट, डाळीचे पीठ, ताक हे साहित्य लागेल.
विदर्भ स्पेशल, हिवाळ्यात बनवा पाण्यातील गोळे, एकदा खाल तर पुन्हा कराल
तुरीचे कढी गोळे बनवण्यासाठी कृती
सर्वात आधी तुरीचे दाणे आणि हिरवी मिरची व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. तुम्ही हे दाणे मिरची पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. त्याची चव आणखी छान लागते. त्यानंतर कढी बनवायला घ्यायची. कढी बनवण्यासाठी सर्वात आधी ताकामध्ये डाळीचे पीठ टाकून ते मिक्स करून घ्यायचे आहे. डाळीचे पीठ एकदम टाकायचे नाही. त्यामुळे कढीचा स्वाद बदलतो. अर्धा लिटर ताक असेल तर 1 टीस्पून डाळीचे पीठ तुम्ही टाकू शकता. त्यानंतर त्यात हळद टाकून घ्यायची. त्यानंतर मीठ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित रवी ने हे ताक फिरवून घ्यायचे आहे.
त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून ते थोडे गरम होऊ द्यायचे. तेल गरम झाले की, त्यात जिरे टाकून घ्यायचे. त्यानंतर मोहरी आणि हिरवी मिरची. हे थोड शिजू द्यायचं आहे. त्यानंतर त्यात कडी पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर लसूण पेस्ट टाकायची आणि ती परतून घ्यायची. त्यानंतर त्यात ताक टाकायचे आणि कढीला उकळी येऊ द्यायची आहे.
कढीला उकळी येईपर्यंत गोळे बनवून घ्यायचे. त्यासाठी सारण तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी तुरीच्या दाण्याचा पेस्टमध्ये मीठ, डाळीचे पीठ, हळद, लसूण पेस्ट, जिरे, कोथिंबीर, कडीपत्ता हे सर्व साहित्य टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यात लागत असल्यास आणखी डाळीचे पिठ टाकून त्याचा थोडा घट्टसर गोळा तयार होईल असे सारण तयार करून घ्यायचे आहे.
तो पर्यंत कढीला उकळी आलेली असेल. आता त्यात छोटे छोटे गोळे बनवून कढीमध्ये टाकून घ्यायचे आहे. गोळे अगदी सहज बनतात. पूर्ण गोळे एका वेळी तयार करून घ्यायचे नाही. कढीला उकळी आली की एक एक बनवून कढी मध्ये टाकायचे आहे. त्यानंतर जो पर्यंत गोळे वर येत नाही तो पर्यंत कढीमध्ये चमचा टाकायचा नाही. त्यामुळे गोळे फुटतात. त्यानंतर गोळे जेव्हा कढीच्या वर यायला लागतात तेव्हा समजायचं की गोळे तयार आहेत. त्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची. कढी गोळे खाण्यासाठी तयार होतात. हे कढी गोळे तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता.