भोगीची भाजी बनवण्यासाठी साहित्य
तेल, मोहरी, जिरे, कांदे, तीळ, सुकं खोबरं, वांगी, गाजर, ओला हरभरा, ओला वाटाणा, ओला पावटा, कांदा लसूण मसाला, गूळ, कोथिंबीर, मीठ.
भोगीच्या भाजीची रेसिपी
सुरुवातीला हिरवा वाटाणा आणि पावटा स्वच्छ धुवून कुकरमध्ये घ्या. त्यात थोडं पाणी घालून 2 शिट्या करून घ्या. कुकर थंड झाल्यावर त्यातील पाणी पूर्ण काढून टाका. आता तीळ मंद आचेवर हलकेसे भाजून घ्या. तीळ थंड झाले की खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये ओबडधोबड बारीक करा.
advertisement
कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी आणि जिरे घालून फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घ्या. कांदा गुलाबी झाला की त्यात हिंग आणि हळद घाला. आता कांदा-लसूण मसाला घालून नीट मिक्स करा. त्यानंतर वांगी, गाजर, हरभरा, वाटाणा आणि पावटा घालून सर्व भाज्या एकत्र ढवळा.
भाजी शिजण्यासाठी थोडं गरम पाणी घाला. यानंतर बारीक केलेले तीळ, मीठ, गूळ, खोबरे आणि कोथिंबीर घाला. गरजेनुसार पाणी घालून भाजी चांगली शिजू द्या. तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी स्वादिष्ट भोगीची मिक्स भाजी तयार आहे.
दरम्यान, मकर संक्रांतीला भोगीची भाजी आवर्जून बनवली जाते. यंदा तुम्ही अशा पद्धतीनं भाजी बनवू शकता. ही रेसिपी सर्वांना आवडेल.





