सांगली: पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. परंतु पाण्याच्या ठिकाणी उन्हाळ्यात देखील मिळणारी आणि उन्हाळ्यात अगदी आवर्जून खावी अशी रानभाजी म्हणजे चिगळ किंवा चिवळ होय. अतिशय थंड, उष्णतेपासून आराम देणाऱ्या आरोग्यदायी चिगळेची भाजी शरीरासाठी लाभदायी मानली जाते. याच भाजीची पारंपरिक रेसिपी आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
चिगळेच्या भाजीसाठी साहित्य
advertisement
अर्धा किलो चिगळेची भाजी, अर्धा वाटी बेसण, मध्यम आकारात चिरलेले दोन कांदे आणि फोडणीसाठी तेल, तिखट, हळद, मीठ, जिरे, मोहरी.
नोकरी मिळाली नाही, तरीही सोडली नाही जिद्द! सुबोध सुरू केला 'हा' छोटा व्यवसाय; आता कमवतोय बक्कळ पैसा
चिगळेच्या भाजीची कृती
सर्वप्रथम चिगळेची भाजी नीट निवडून घ्या. अगदी पानं पानं घ्यायची गरज नाही. पण त्याची सगळी मूळं काढून फक्त कोवळी बारीक बारीक पाने ठेवा. नंतर ही स्वच्छ केलेली भाजी पाण्याने दोन वेळा धुवून घ्या. धुतल्यावर थोडी कोरडी करून नंतर बारीक चिरून घ्या. फोडणीसाठी कढईत तेल घालून जिरे, मोहरीची खरपुस फोडणी घाला. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तो मस्त परतून घ्या.
कांद्याला सोनेरी रंग आला की मग त्यावर तिखट, हिरवी मिरची, मीठ, हळद घालुन चिरलेली भाजी त्यात टाकुन देऊन सगळी भाजी एकजीव करुन घ्या. नंतर त्या भाजीत बेसन पसरून घ्या. बेसन टाकल्यानंतर भाजी चांगली हलवून घ्या.आणि झाकण ठेवून भाजी 5 ते 7 मिनिटे मंद गॅसवर शिजवून घ्या.
अवघ्या काही मिनिटात तयार होणारी, उन्हाळ्यात गारवा देणारी चिगळेची भाजी दही आणि ज्वारीच्या भाकरीसोबत चिभेला उत्तम चव देते. तुम्ही देखील ही आरोग्यदायी रानभाजी नक्की ट्राय करू शकता.