जाणून घेऊयात मसूराच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे.
त्वचा विकारांवर गुणकारी मसूराची डाळ :
मसूराच्या डाळीत विविध पोषक तत्त्वांसह व्हिटॅमिन बी कॉप्लेक्स असतं. मसूराच्या डाळीची पावडर किंवा पीठ हे थोडंसं खरखरीत असतं. गेल्या अनेक वर्षापासून या पिठाचा वापर नैसर्गिक स्क्रबर म्हणून केला जातोय. जेव्हा मसूराचं पीठ चेहऱ्यावर लावतो तेव्हा ते त्वचेच्या छिद्रात शिरून आतली घाण आणि त्वचेचा तेलकटपणा दूर करतं. याशिवाय मसूराचं पीठ लावल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग निघून जातात. मसूराच्या सोबत काही पदार्थ मिसळून ते लावल्याने त्वचा विकार दूर होऊन त्वचेचं सौंदर्य खुलून यायला मदत होते.
advertisement
मसूर आणि बदाम तेल पेस्ट :
जर तुमच्या चेहऱ्यावर खूप डाग येत असतील तर नियमितपणे मसूराचं पीठ आणि बदामाच्या तेलाची पेस्ट लावावी. रात्रभर मसूर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी मिक्सरमध्य़े वाटून त्याचं बारीक पीठ करून घ्या. बदामाच्या तेलात हे पीठ एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा जेणेकरून काळ्या डागांची समस्या कमी होऊ शकेल.
मसूर आणि कच्चं दूध :
तुम्ही मसूराच्या डाळीचं पीठ आणि कच्च्या दुधाची पेस्ट बनवू शकता आणि ते काळ्या डागांवर किंवा वांगांवर लावू शकता. मसूर बारीक करून त्यात थोडं कच्चं दूध टाका. तुम्हाला हवं असल्यास, त्यात 1 चमचा मधही टाकू शकता. साधारण हे 20 मिनिटं काळ्य़ा डागांवर लावून ठेवा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. तुमच्या चेहऱ्यावरचे डाग दूर व्हायला मदत होईल.
मसूर आणि कोरफड पेस्ट :
मसूर आणि कोरफडीची पेस्ट त्वचेला हायड्रेट करते. ज्यामुळे डाग कमी व्हायला मदत होते. यासाठी आधी तुम्हाला कोरफडीचं जेल लागेल. तुम्ही ते बाहेरून विकत आणू शकता किंवा तुमच्या घरात कोरफड असेल तर ती ही वापरू शकता. मसूराची डाळ वाटून ती कोरफडीच्या जेलमध्ये मिक्स करून ते चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा. नंतर 10 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून 3 वेळा असं केल्याने काळ्या डागांची समस्या दूर होऊ शकते.