लवचिकता हा एक महत्त्वाचा गुण आहे, जो मुलांना बुलिंग सारख्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करतो. हा गुण मुलांना कोणत्याही कठीण परिस्थितीतून सावरण्याची आणि त्यातून शिकून अधिक मजबूत होण्याची क्षमता देतो. काही मुले नैसर्गिकरित्या लवचिक असली, तरी योग्य मदतीने हा गुण त्यांच्यात विकसित करता येतो.
मुलांना समस्यांचा सामना कसा करावा, त्यांच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे आणि उपाय कसे शोधावे हे शिकवून, तुम्ही त्यांना आत्मविश्वास आणि आंतरिक सामर्थ्य मिळवण्यासाठी मदत करू शकता. चला तर मग पाहूया, मुलांना अधिक लवचिक बनवण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स..
advertisement
भावना समजून घेण्यास मदत करा : जेव्हा मुले एखाद्या समस्येमुळे निराश होतात, तेव्हा त्यांच्या भावना कमी लेखू नका. त्याऐवजी, "मला माहित आहे की तू दुखी आहेस," किंवा "हे खरंच कठीण आहे," असे म्हणून त्यांच्या भावनांना स्वीकारा. यामुळे त्यांना त्यांच्या भावना समजून घेण्यास आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
समस्या सोडवणे शिकवा : मुलांना लगेच उपाय देण्याऐवजी, त्यांना स्वतःहून समस्या सोडवण्याची संधी द्या. त्यांना प्रश्न विचारा, जसे की, "यावर काय उपाय असू शकतो?" किंवा "या परिस्थितीत तू आणखी काय करू शकतोस?" यामुळे त्यांच्यामध्ये स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढेल.
अपयश पचवून पुढे जायला शिकवा : अपयश हा यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे, हे मुलांना समजावून सांगा. अपयशामुळे निराश न होता, "यातून आपण काय शिकलो?" असा विचार करण्यास त्यांना प्रवृत्त करा.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवा : मुलांसमोर नेहमी सकारात्मक बोला. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आव्हानांचा सामना कसा केला, हे त्यांना सांगा. यामुळे त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते कठीण परिस्थितीतही सकारात्मक राहतील.
छोट्या जबाबदाऱ्या द्या : मुलांना त्यांच्या वयानुसार छोट्या जबाबदाऱ्या द्या. यामुळे त्यांना स्वतःच्या कामांची जाणीव होईल आणि ते अधिक जबाबदार होतील.
'ग्रोथ माइंडसेट' शिकवा : मुलांना 'ग्रोथ माइंडसेट' शिकवा. म्हणजेच, "मी हे करू शकत नाही," असे बोलण्याऐवजी, "मी हे करायला शिकू शकतो," असे म्हणायला शिकवा. यामुळे त्यांच्यामध्ये शिकण्याची आणि प्रयत्न करण्याची इच्छा वाढेल.
कौतुक करा : जेव्हा मुले आव्हानांचा सामना करतात, तेव्हा त्यांच्या प्रयत्नांचे आणि धैर्याचे कौतुक करा. यामुळे त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल.