गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या स्लम टुरिझमची वार्षिक उलाढाल सुमारे 10 ते 14 कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे. धारावीत सुमारे 20 ते 24 लहान-मोठे टूर ऑपरेटर्स काम करतात आणि त्यांच्या 100 ते 150 टूर गाइड्सच्या मदतीने हे टूर आयोजित केले जातात.
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! लवकरच खुला होणार मेट्रोचा नवा मार्ग, कुठून कुठंपर्यंत धावणार?
advertisement
स्लम टुरिझम म्हणजे गरिबी दाखविणे नव्हे
धारावीतील रहिवासी फहीम वोरा म्हणतात, “स्लम टुरिझम म्हणजे आम्ही आमची गरिबी दाखवतो, असा गैरसमज आहे. प्रत्यक्षात आम्ही पर्यटकांना धारावीचा आत्मा म्हणजेच मेहनत, एकता आणि संघर्षाची कहाणी दाखवतो.” त्यांच्या मते, धारावीचा पुनर्विकास होणे आवश्यकच आहे, पण त्याचबरोबर धारावीतील ऐक्य, मेहनत आणि छोट्या उद्योगांची ओळख कायम ठेवली पाहिजे. “धारावीचे डॉक्युमेंटेशन व्हायला हवे, जेणेकरून पुनर्विकासनंतरचे सामाजिक आणि भौगोलिक बदल भविष्यात नोंदवता येतील,” असे ते म्हणतात.
धारावीतील जीवन, एका वेगळ्या जगण्याचा अनुभव
धारावीतील लघुउद्योग, छोट्या गल्ल्यांमधील कारखाने, गजबजलेली बाजारपेठ, शाळा, बेकरी आणि दाट वस्त्यांमधील जीवन हे पर्यटकांसाठी एक “रिअल लाइफ अनुभव” ठरते. येथे येणाऱ्या पर्यटकांना काही ठराविक नियम पाळावे लागतात — स्थानिकांच्या परवानगीशिवाय फोटो वा व्हिडिओ काढू नयेत, भावनात्मक हावभाव टाळावेत आणि रहिवाशांची प्रायव्हसी जपावी, अशा सूचना टूर आयोजकांकडून दिल्या जातात.
ब्रिटिश पर्यटकाने केली ‘स्लम टूर’ची सुरुवात
धारावीतील स्लम टुरिझमची सुरुवात ब्रिटिश पर्यटक जिस वे आणि दक्षिण भारतीय कृष्णा पुजारी यांनी केली. आफ्रिकेतील फेवेला टूरच्या धर्तीवर त्यांनी धारावीत एज्युकेशनल स्लम टूर सुरू केली. ही भारतातील पहिली अधिकृत स्लम टूर मानली जाते.
‘आय ओपनर’ ठरणारी धारावी सफर
टूर गाइड समीर कांबळे यांच्या मते, “धारावी स्लम टूर ही अनेक परदेशी पर्यटकांसाठी आय ओपनर ठरते. इथल्या लोकांच्या कष्टातून त्यांना जगण्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो.” स्लम टूरचे सह-संस्थापक कृष्णा पुजारी म्हणतात, “जर धारावीचा पुनर्विकास योग्य पद्धतीने झाला, तर तो जगभरात सकारात्मक संदेश देईल. पुनर्विकासानंतरची धारावी जगासमोर दाखवता येईल — एक नवी, सक्षम आणि प्रेरणादायी धारावी.”
धारावीतील रहिवासी मोहम्मद मादिक यांच्या मते, “धारावी बाहेरून झोपडपट्टीसारखी दिसते, पण आतून ती मेहनतीने भरलेली आहे. इथली खरी सुंदरता म्हणजे लोकांचे उद्योग आणि त्यांची झुंज.” त्यांच्या मते, पुनर्विकास तर आवश्यक आहे, पण या उद्योगांना त्यात सामावून घेतले पाहिजे. “असे झाले तर भविष्यातही पर्यटक धारावीला भेट देतील,” असे ते सांगतात.






