18 व्या शतकाच्या उत्तरार्धात खोत कुटुंबाच्या नावावरून या वाडीची स्थापना झाली असे मानले जाते. सुरुवातीला येथे ईस्ट इंडियन आणि कॅथलिक समुदायातील कुटुंबांनी वास्तव्य केले. त्यांनी आपली जीवनशैली, परंपरा आणि सण यांचा वारसा आजपर्यंत जपला आहे. त्यामुळे या वाडीला “हेरिटेज व्हिलेज” म्हणूनही ओळखले जाते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच गिनीज बुकात! कारण वाचून अभिमान वाटेल
advertisement
खोताच्या वाडीचं आकर्षण
खोताच्या वाडीतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रंगीबेरंगी, पोर्तुगीज शैलीतील घरे. लाकडी बाल्कनी, कोरीव खिडक्या, अरुंद गल्ल्या आणि जुन्या काळाची आठवण करून देणारी वास्तुरचना यामुळे येथे फिरताना एखाद्या वेगळ्याच काळात गेल्यासारखे वाटते. काही घरे शंभर वर्षांहून अधिक जुनी असून त्यावर पोर्तुगीज वास्तुकलेचा प्रभाव स्पष्ट दिसतो.
विशेष म्हणजे, ख्रिसमससारखे सण येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्या काळात संपूर्ण वाडी रोषणाईने उजळून निघते आणि स्थानिक रहिवासी आपल्या घरांची आकर्षक सजावट करतात. त्यामुळे हा परिसर छायाचित्रणासाठी अधिकच खुलून दिसतो.
इथे कसे जायचे?
खोताची वाडी मुंबईतील गिरगाव भागात असल्यामुळे येथे पोहोचणे सोपे आहे. जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे चर्नी रोड रेल्वे स्टेशन. स्टेशनपासून ही वाडी साधारण १०-१५ मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहे. तसेच मुंबई मेट्रो किंवा बस सेवेद्वारेही गिरगाव परिसरात सहज पोहोचता येते. टॅक्सी किंवा ऑटो रिक्षाही सहज उपलब्ध असतात.
वेगाने बदलणाऱ्या मुंबईत खोताची वाडी ही इतिहास, वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा जपणारी एक अनमोल जागा आहे. जुन्या आणि नव्या मुंबईचा संगम अनुभवायचा असेल, तर या ठिकाणाला नक्की भेट द्यावी.





