सातारा: एकेकाळी मराठ्यांच्या राजधानीचं शहर असलेल्या साताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. काही काळ अजिंक्यतारा किल्ला हे राजधानीचं ठिकाण होतं. हा किल्ला सात टेकड्यांनी वेढलेला आहे. यातीलच एक टेकडी सातारा शहराचं मध्यवर्ती ठिकाण असून चार भिंती परिसर म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या येथे चार भिंती हुतात्मा स्मारक आहे. या ठिकाणचाही मोठा इतिहास आहे. याबाबत इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांनी माहिती दिलीय.
advertisement
टेहळणीची टेकडी चार भिंती
साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला हे एकेकाळी राजधानीचं ठिकाण होतं. हा किल्ला सात टेकड्यांनी वेढलेला आहे. यातील एक टेकडी सध्या सातारा शहराचं मध्यवर्ती ठिकाण आहे. पूर्वी टेहळणीची टेकडी म्हणून हे ठिकाण ओळखलं जात होतं. आता चार भिंती परिसरातून सातारा शहराचं मनोहरी दृश्य पाहायला मिळतं. विशेष म्हणजे संपूर्ण शहर या ठिकाणाहून दिसतं. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस याठिकाणी गर्दी होते.
3 टन वजन अन् 8 फूट लांबी, वाघाच्या तोंडाच्या आकाराची ऐतिहासिक तोफ पाहिलीये का? Video
चार भिंतीवर नजर महाल
छत्रपती प्रतापसिंह महाराज 1808 साली सातारच्या गादीवर बसले. त्यावेळी त्यांनी चार भिंतीवर एक नजर महाल बांधला. सातारा मराठ्यांची राजधानी असल्यामुळे विजया दशमी दसऱ्याच्या दिवशी शाही मिरवणूक निघत होती. छत्रपतींची ही मिरवणूक राजघराण्यातील स्त्रियांना पाहता यावी म्हणून चार भिंतींवर नजर महालाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून हा परिसर नजर महाल म्हणून ओळखला जावू लागला.
हुतात्मा स्मारक निर्मिती
पुढे चार भिंती परिसरात 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्याच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारकाची निर्मिती करण्यात आली. या स्मारकात चारही बाजूंनी भिंती आहेत आणि मधोमध एक शहीद स्तंभ आहे. त्यावर हुतात्म्याच्या आठवणीत कोनशिला बसवण्यात आल्या आहेत. यामध्ये राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशिला आहेत. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या शतकपूर्ती वर्षाला याचे बांधकाम करण्यात आले. तेव्हापासून हा परिसर चार भिंती परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला, असे इतिहास अभ्यासक सांगतात.
सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची second inning, माळरानावर लावली 1500 आंब्याची झाडे, कमाई पाहिली का?
कर्मवीर अण्णांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुढे याच चार भिंती परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. 2001 मध्ये हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण करण्यात आले. चार भिंतींचा हा परिसर अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. तसेच सध्या सातारकरांचं आवडीचं ठिकाण आहे. तसेच बाहेरून येणारे पर्यटकही आवर्जून चार भिंती स्मारकाला भेट देतात.