नेमका हा कोणता व्यायाम?
सुट्टीच्या एका दिवसात काही मिनिटांसाठी हा व्यायाम केल्याने ते शरीरासाठी फायद्याचं ठरू शकतं. सुट्टीच्या दिवशी केला जाणारा व्यायाम म्हणून याला वीकेंड वर्कआऊट असं म्हणता येऊ शकतं. आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की, जीममध्ये न जाता फिट कसं राहता येऊ शकतं किंवा आठवड्यातून फक्त एक दिवस व्यायाम केल्याने कसा फायदा होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं समोर आलं आहे की, जर तुम्ही फक्त वीकेंडलाच व्यायाम केला तरीही तुमच्या शरीराला आणि मेंदूला नियमित व्यायामासारखेच फायदे मिळतात.
advertisement
जाणून घेऊयात या विकेंड वर्कआऊट विषयी.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आले आहे की, वीकेंडला व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नियमित व्यायामासारखेच फायदे मिळतात. दोन्ही वर्कआउट्सचा मेंदूवर समान परिणाम होतो. गेल्या काही अभ्यासांमध्ये असं आढळून आलं होतं की, व्यायामामुळे मेंदूचं आरोग्य सुधारायला मदत होते. ज्या व्यक्ती नियमितपणे व्यायाम करतात किंवा जे वृध्द स्वत:ला फिट ठेवण्यासाठी साधे सोपे व्यायाम करतात, त्यांना स्मृतिभ्रंश आजाराचा धोका कमी होतो. नुकतंच 10 हजारांपेक्षा अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, अजिबातच व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत वींकेडला व्यायाम करणाऱ्या व्यक्तींचा मेंदू स्वस्थ राहतो आणि त्यांनासुद्धा दररोज व्यायाम करणाऱ्या व्यक्तीं इतकाच फायदा मिळून सौम्य डिमेंशिया होण्याचा धोका कमी होतो.
या अभ्यासाच्या प्रमुख लेखक डॉ. गॅरी ओ डोनोव्हन म्हणतात की, ‘आठवड्यातून एक किंवा दोनदा व्यायाम करण्याचे फायदे हे जवळपास नियमित व्यायामासारखेच आहेत. आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना होणारे फायदे आता संशोधनाचा एक चांगला विषय बनलाया. ज्या व्यक्ती नियमितपणे व्यायाम करतात त्यापेक्षा ते सुट्टीच्या दिवशी जास्त व्यायाम करतात, जो त्यांचा शरीरासाठी आणि मेंदूसाठी फायद्याचा ठरतो. यामुळे मानसिक आरोग्यातही सुधारणा दिसून येते.
अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये या संदर्भात आणखी एक अभ्यास करण्यात आलाय. ज्यात असं दिसून आलं की, जे लोक आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 दिवस व्यायाम करतात त्यांना अजिबात व्यायाम न कराणाऱ्यांच्या तुलनेत 200 पेक्षा जास्त आजारांचा धोका कमी असतो. जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांनाही हे फायदे मिळतात.त्यामुळे अधूनमधून व्यायाम हा शरीरासोबत मेंदूसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो.
तुम्ही जर रोज व्यायाम करत असाल तर तो तुमच्या फायद्याच आहे. मात्र तुम्हाला रोज व्यायाम करता येत नसेल तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी व्यायाम केल्यानेसुद्धा फिट राहू शकता.