पण मंडळी, पुस्तक पाहिल्यावर झोप येणं ही केवळ तुमची समस्या नाही, तर यामागे विज्ञानाची काही रंजक कारणं दडलेली आहेत. वाचताना डुलकी का लागते आणि ही सुस्ती झटकून एकाग्रता कशी वाढवायची? चला सविस्तर जाणून घेऊया.
1. डोळ्यांवरील ताण आणि मेंदूचा थकवा
वाचताना आपले डोळे सातत्याने एकाच ठिकाणी आणि बारीक अक्षरांवर फोकस करतात. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो. जेव्हा डोळे थकतात, तेव्हा ते मेंदूला 'आराम हवाय' असा संकेत पाठवतात. दुसरीकडे, मेंदू नवीन माहिती समजून घेण्यात आणि ती साठवण्यात आपली ऊर्जा खर्च करत असतो. या दुहेरी कामामुळे शरीर लवकर थकतं आणि आपल्याला झोप येऊ लागते.
advertisement
2. कठीण विषय आणि मेंदूचा 'बचाव' मोड
जर तुम्ही वाचत असलेला विषय खूप कठीण असेल किंवा तो तुम्हाला समजत नसेल, तर मेंदूवरचा दबाव वाढतो. अशा वेळी मेंदू या 'दबावा'पासून वाचण्यासाठी शरीराला आरामाचे सिग्नल देतो. परिणामी, तुम्हाला वाचताना सुस्ती जाणवू लागते. हा एक प्रकारे मेंदूने स्वतःला ओव्हरलोड होण्यापासून वाचवण्याचा मार्ग असतो.
3. अपुरी झोप आणि 'शांत' वातावरण
जर तुमची रात्रीची 7-8 तासांची झोप पूर्ण झाली नसेल, तर शरीरात थकवा साचलेला असतो. जेव्हा तुम्ही अभ्यासासाठी शांत ठिकाणी बसता, तेव्हा शरीराला वाटतं की हीच विश्रांतीची वेळ आहे. शांत वातावरणामुळे सुप्त अवस्थेत असलेली झोप लगेच उफाळून येते. विशेषतः परीक्षेच्या काळात रात्री जागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे जास्त घडतं.
4. जेवण आणि रक्ताभिसरण
भरपेट जेवण केल्यानंतर आपली पचनसंस्था अन्नाचे पचन करण्यासाठी सक्रिय होते. अशा वेळी रक्ताचा प्रवाह पोटाकडे जास्त वळवला जातो आणि मेंदूला मिळणारा रक्तपुरवठा किंचित मंदावतो. म्हणूनच जड जेवणानंतर लगेच अभ्यासाला बसल्यास हमखास झोप येते.
5. अभ्यासाची चुकीची पद्धत
अनेकांना बेडवर लोळून किंवा उशी घेऊन वाचायला आवडतं. पण ही सर्वात मोठी चूक आहे. आपलं शरीर बेडला 'झोपण्याच्या जागे'शी जोडून पाहतं. आरामदायी स्थितीत बसल्यामुळे मेंदू 'स्लीप मोड'मध्ये जातो. तसेच, कमी प्रकाशात वाचल्याने डोळ्यांवर जास्त ताण येतो आणि थकवा लवकर जाणवतो.
वाचताना येणारी झोप कशी टाळाल?
खुर्ची-टेबलचा वापर: कधीही बेडवर बसून वाचू नका. ताठ बसल्याने मेंदू सतर्क राहतो.
पुरेशी प्रकाश व्यवस्था: वाचताना प्रकाश थेट पुस्तकावर पडेल याची काळजी घ्या, जेणेकरून डोळ्यांवर ताण येणार नाही.
पाणी पिणे: स्वतःला हायड्रेटेड ठेवा. थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायल्याने सुस्ती कमी होते.
पोमोडोरो तंत्र: सतत 2 तास वाचण्यापेक्षा 25-20 मिनिटांनंतर 5 मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या.
तोंड धुवा: खूपच झोप येत असेल, तर थंड पाण्याने तोंड धुतल्याने तात्काळ ताजेतवाने वाटते.
