खरंतर डिलिव्हरीच्या वेळी बाळ रडलं नाही तर ही कुटुंबियांसाठी दुखाची बातमी असते, कारण वैद्यकीय शास्त्रानुसार, बाळाचं ते पहिलं रडणं हे त्याच्या आयुष्यासाठी सर्वात महत्त्वाचं 'वरदान' असतं.
मग आता प्रश्न असा की बाळ जन्मल्यावर हसत का नाही? ते फक्त रडतच का असतं? डॉक्टर याला वरदान का मानतात? या प्रश्नांची उत्तरं आपल्या शरीराच्या गुंतागुंतीच्या रचनेत दडलेली आहेत.
advertisement
रडणं ही इमोशनल नाही, तर बायोलॉजिकल गरज आहे
बाळ जन्मल्यावर रडण्यामागे कोणतंही दुःख नसतं, तर ती एक जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेली जैविक प्रक्रिया असते.
आईच्या गर्भात असताना बाळ नाळेद्वारे ऑक्सिजन घेत असतं. पण बाहेरच्या जगात आल्यावर त्याला स्वतःच्या फुफ्फुसांनी श्वास घ्यावा लागतो. जेव्हा बाळ जोरात रडतं, तेव्हा त्याच्या फुफ्फुसांमधील द्रव पदार्थ बाहेर निघतो आणि फुफ्फुसं पूर्णपणे विस्तारतात. यामुळे बाळ पहिल्यांदा नैसर्गिकरीत्या श्वास घेऊ शकतं.
डॉक्टरांच्या मते, बाळ जितक्या जोरात रडतं, तितकं ते अधिक सुदृढ असल्याचं मानलं जातं. याचा अर्थ असा की बाळाची श्वसनसंस्था नीट काम करत आहे आणि त्याच्या शरीरात पुरेसा ऑक्सिजन पोहोचत आहे.
बाळ हसत का नाही?
बाळ जन्माला आल्यावर हसू किंवा स्मितहास्य का करू शकत नाही, याचं उत्तर त्याच्या मेंदूच्या विकासात आहे.
1. ब्रेनस्टेमचा ताबा: रडण्याची क्रिया मेंदूच्या ब्रेनस्टेम या भागातून नियंत्रित होते. हा मेंदूचा सर्वात प्राथमिक भाग आहे जो गर्भातच विकसित होतो.
2. हसण्यासाठी हवं सोशल ब्रेन : हसणे किंवा स्मितहास्य करणे ही एक सामाजिक आणि भावनिक प्रतिक्रिया आहे. यासाठी मेंदूच्या वरच्या भागाचा विकास होणं गरजेचं असतं, जो जन्मानंतर हळूहळू विकसित होतो. म्हणूनच बाळाला पहिलं हसू उमटवायला साधारण 6 ते 8 आठवडे लागतात, तर मनसोक्त हसायला 3 ते 4 महिने वाट पाहावी लागते.
रडणं हीच त्याची पहिली भाषा
जोपर्यंत बाळ बोलू शकत नाही किंवा खुणा करू शकत नाही, तोपर्यंत रडणं हीच त्याची एकमेव भाषा असते. भूक लागणे, अस्वस्थ वाटणे, वेदना होणे किंवा आईच्या स्पर्शाची गरज असणे, या सर्व गोष्टी बाळ रडूनच सांगतं. हे रडणं पालकांना हे समजण्यास मदत करतं की बाळाला नक्की काय हवं आहे.
बाळाचं पहिलं रडणं ही निसर्गाची एक संरक्षणात्मक पद्धत आहे. त्या क्षणी बाळाच्या शरीराचं आणि मेंदूचं पूर्ण लक्ष केवळ जिवंत राहण्यावर असतं, आनंद व्यक्त करण्यावर नाही. आनंद, हसू आणि खेळणं हे सर्व नंतर येतं, जेव्हा बाळ स्वतःला या जगात सुरक्षित समजू लागतं.
