गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या गुढीसाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेच्या गाठींना देखील मोठी मागणी असते. त्यामुळे मंडई बाजारात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी गाठी ग्राहकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. यामध्ये साध्या गाठींबरोबरच फुलांच्या डिझाइनच्या, मिररवर्क असलेल्या तसेच विविध रंगांमध्ये तयार केलेल्या आकर्षक गाठी उपलब्ध झाल्या आहेत.
advertisement
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
विक्रेत्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत नॅनो गुढीच्या साहित्यामध्ये अनेक नवीन प्रकार बाजारात आले आहेत. गेल्या 25 वर्षांपासून हा व्यवसाय करत असलेले विक्रेते माधव लाल यांनी सांगितले की, पूर्वी साध्या गाठींचीच जास्त विक्री होत होती. मात्र आता ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार फुलांच्या डिझाइनच्या, मिरर असलेल्या तसेच रंगीत गाठी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. तसेच गुढीचेही विविध प्रकार आणि वेगवेगळ्या आकारातील नॅनो गुढ्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या साखरेच्या गाठींची किंमत साधारणपणे 20 रुपये प्रति नगापासून सुरू होत आहे. तर आकर्षक सजावटीच्या नॅनो गुढी दर 90 रुपयांपासून पुढे आहेत. गुढीचे चार ते पाच प्रकार उपलब्ध असून ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दरम्यान, वाढत्या महागाईचा परिणाम या साहित्यावरही झाल्याचे दिसून येत आहे. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी गाठी आणि गुढीच्या साहित्याच्या किमतींमध्ये साधारण 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होत आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे दर वाढले असले तरी ग्राहकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही.
गुढीपाडवा जवळ आल्याने पुण्यातील मंडई बाजारपेठ पुन्हा एकदा सणाच्या रंगात रंगलेली दिसत आहे. विविध प्रकारच्या गाठी, आकर्षक नॅनो गुढ्या आणि पारंपरिक सजावटीच्या वस्तूंमुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.





