दिवाळीचा सण सरताच राज्यात जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होऊ शकते, असे जाणकार सांगतात. त्यामुळे संभाव्य गणिते लक्षात घेऊन इच्छुक नेतेमंडळींनी आतापासूनच तयारी सुरुवात केली आहे.
ST अध्यक्षपद राखीव झाल्याने जिल्ह्यात हालचालींना वेग
अनुसूचित जातीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव झाल्याने जिल्ह्यात हालचालींना वेग आलेला आहे. शरद पवार यांचे अकोले येथील खंदे समर्थक अमित भांगरे यांनी राधाकृष्ण विखे यांची भेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या सुनीता भांगरे आणि भाजपचे माजी आमदार वैभव पिचड होते. शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात ही भेट झाली.
advertisement
...तर तो शरद पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का
विखे पाटलांच्या भेटीमुळे अमित भांगरे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. राष्ट्रवादीची दोन शकले पडल्याने आणि काँग्रेस-शिवसेनेचा फारसा बोलबाला नसल्याने जिल्ह्यात भाजपला चांगल्याच कामगिरीची आशा आहे. तसेच जिल्ह्यात भाजपची ताकदही चांगलीच वाढलेली आहे. त्यामुळे आगामी राजकीय संधीचा विचार करून भांगरे यांनी विखे पाटील यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. जर अमित भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर तो शरद पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का असेल.