याबाबत राज्य सरकारने ८ डिसेंबर २०२५ रोजी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार, नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागातील आश्रमशाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
किती वाढला प्रोत्साहन भत्ता?
वित्त विभागाने निर्गमित केलेल्या या नवीन परिपत्रकानुसार, राज्यातील दुर्गम, धोकादायक आणि नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सातव्या किंवा सहाव्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या १५ टक्के इतका प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला आहे.
advertisement
याची मर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. या वाढीव भत्त्यासाठी किमान २०० रुपये आणि कमाल १५०० रुपये प्रति महिना अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विशेषतः कमी मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पूर्वी अत्यल्प भत्ता मिळत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता भत्त्याची रक्कम थेट १५०० रुपयांपर्यंत वाढणार आहे. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांना पूर्वीचा भत्ता देय होता, पण मिळाला नव्हता, त्यांना फरकाची रक्कमही देण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
या कर्मचाऱ्यांनाच मिळणार लाभ
हा वाढीव प्रोत्साहन भत्ता फक्त नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील क्षेत्रात मुख्यालय असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच लागू होणार आहे. सामान्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या शिक्षक-कर्मचारी यांच्या सेवाभावाची आणि जोखमीची दखल घेत सरकारने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे.
