यवतमाळ इथं असलेल्या पोलिस कवायत मैदानात एका 24 वर्षीय पोलिस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अभिषेक दशरथ आडे असं मृत शिपायाचं नाव होतं. फिंगर प्रिंट शाखेत कार्यरत असून पोलिस मित्र सोसायटी, लोहारा इथं तो राहत होता. गुरुवारी सकाळी अभिषेक मित्रांसोबत व्यायाम करत होता, त्यानंतर त्याने धावण्यास सुरुवात केली. धावत असताना काही मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अभिषेकला तपासून मृत घोषित केलं. हृदयरोगतज्ञ डॉ. महेश शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अभिषेकची ईसीजी केली तेव्हा सिव्हिअर हार्ट अटॅकची लक्षणं निदर्शनास आली. त्यानंतर तातडीने उपचारास सुरुवात केली, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि यातच अभिषेकचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. अभिषेक आडे 2001 मध्ये अनुकंपा तत्त्वावर पोलिस दलात रुजू झाला होता.
