गोंदिया : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलांनी आपला जीव गमावल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून नाशिक आणि पुण्यात घडल्या आहे. अशातच आता गोंदियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हुंड्याच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांत नवऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृतक महिलेच्या पती आणि सासूला अटक केली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया शहरातील गणेशनगर इथं राहणाऱ्या सरिता पराग अग्रवाल (28) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सरिता गुप्ता हिचा विवाह 7 जून 2023 रोजी पराग अग्रवाल (रा. गणेश अपार्टमेंट, गोंदिया) याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेले. मात्र, नंतर सासू श्रद्धा अग्रवाल आणि नणंद पूर्वा अग्रवाल यांनी घरकाम, वागणूक, पैशांच्या मागणीवरून सरिताचा सतत मानसिक छळ सुरू केला.
पती पराग अग्रवाल हा दारू पिऊन किरकोळ कारणावरून सरिताला मारहाण करीत होता. सतत शिवीगाळ, धमकी आणि अत्याचार सुरूच असल्याने सरिताने हा प्रकार फोनवर आई आणि भावंडांना सांगितला होता. त्यानंतर सरिताने या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.
हार्ट अॅटक आला म्हणून सांगितलं
सरिता असं पाऊल उचलू शकत नाही. ती घरी आल्यावर नेहमी सासरची लोक पैशाची मागणी करत होते. तिचा छळ करत होती असं सांगत असायची. ती नेहमी सासरी लेकीचा छळ करू नका, याबद्दल व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवत होती. या लोकांनी तिला मारलं आणि गळफास दिला. आम्हाला फोन करून सांगितलं की, सरिताला हार्ट अॅटक आला. आम्ही जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा तिचा चेहरा झाकून ठेवला होता. तिच्या मानेवर दोरीचे निशाण होते, हातावर आणि पाठीवर मारहाण झाल्याचे व्रण होते, असा आरोपी मृत सरिताचा भाऊ प्रवीण गुप्ता यांनी केला.
पती आणि सासूला अटक
सरिताने आत्महत्या पती आणि नणंदेच्या छळाला कंटाळून केली असल्याची बाब पुढे आल्याने गोंदिया शहर पोलिसांनी तिघांवर मृत महिलेचा भाऊ प्रवीण ऊर्फ प्रदीप गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत मृतक महिलेच्या पती आणि सासूला अटक केली आहे. या प्रकरणात पती पराग अग्रवाल, सासू श्रद्धा अग्रवाल आणि नणंद पूर्वा अग्रवाल यांच्याविरुद्ध हुंडाबळी, मारहाण, छळ, संशयास्पद मृत्यू कलम 80, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
