मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना ही उल्हासनगर कॅम्प 5 मधील प्रेम नगर टेकडी इथं घडली. या परिसरात राहणाऱ्या अकरा वर्षीय हर्ष चव्हाण आपल्या परिसरात धुळवड खेळला. त्यानंतर दुपारी रंग खेळल्यानंतर रंग काढायला दुपारच्या सुमारास आपल्या वडिलांसोबत बदलापूरच्या शांती सागर रिसॉर्टमागील उल्हास नदीवर आला होता. आंघोळीसाठी नदीत उतरला परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छदनासाठी आणण्यात आला आहे. दरम्यान या घटनांनंतर प्रेम नगर टेकडी परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement
आंघोळीसाठी उल्हास नदीवर जाणं जिवावर बेतलं
तर दुसरी घटना, बदलापूर पाठोपाठ वांगणीमध्ये घडली आहे. उल्हास नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. मिलिंद झांजे (वय 31) असं या तरुणाचं नाव आहे. होळी खेळल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत आंघोळीसाठी उल्हास नदीवर गेला होता. काराव गावाजवळ पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडाला. एकाच दिवसात बदलापुरात ४, तर अंबरनाथमध्ये १ तर वांगणीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
धुळवडीचा रंग बेतला जीवावर, 3 मित्रांचा बुडून मृत्यू
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील देहूरोडच्या इंद्रायणी नदीच्या बोडकेवाडी बंधाऱ्यात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मित्राला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. धुळवड साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या मित्रांपैकी एक मित्र बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. देहूरोडच्या इंद्रायणी नदीवरील बोडकेवाडी बंधाऱ्यात ही दुर्घटना घडली.
राज दिलीप अघमे, आकाश विठ्ठल गोरडे, आणि गौतम कांबळे, अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. सहा तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यापैकी एक तरुण बुडत असताना त्याला वाचवायला त्याचे तीन मित्र गेले. बुडणारा तरुण वाचला मात्र त्याच्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असून घटनास्थळी, वन्यजीव रक्षक मावळची टीम आणि देहूरोड पोलीस पथकाने या तरुणांना पाण्यातून बाहेर काढले मात्र पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी या तीन तरुणांना मृत घोषित केलं.