हरिदास गाडेकर यांनी 20 गुंठे क्षेत्रात 'अष्टगंधा' आणि 'पितांबरी' वाणाचा झेंडू लावला आहे. सध्या त्यांची फुलशेती बहरली असून फुलांची दररोज विक्री सुरू आहे. या फुलशेतीतून 1.50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती गाडेकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली. फुल शेतीतून बाराही महिने उत्पादन घेता येतं. त्यामुळे गाडेकर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत विविध फुलांची शेती करतात. त्यांच्याकडे विहीर असल्यामुळे शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवत नाही.
advertisement
सामान्यपणे झेंडूची लागवड मे आणि जूनमध्ये केली जाते. फुलांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यास 'डेलिकेट', 'आकाया' आणि 'प्राईड' या कीटकनाशकांची फवारणी करता येते. याशिवाय फुलांवर बुरशी देखील लागते. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे फुलांवर बुरशीचा परिणाम झालेला नाही.
फुल शेती करण्याचा विचार करत असलेल्या शेतकऱ्यांनी फुलांची आणि देखभालीची माहिती घ्यावी. झेंडू असो किंवा इतर फुलझाडं त्यांची लागवड दाट केली तर बुरशीचा सामना करावा लागत नाही. शक्यतो जूनमध्येच फुलांची लागवड करायला हवी. उन्हाळ्यामध्ये पाणी असल्यास ठिबक सिंचनचा वापर करून लागवड केली तरी चालते. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या दरम्यान फुल शेतीतून समाधानकारक पैसे मिळतात, अशी माहिती गाडेकर यांनी दिली.





