ओम एक होतकरू आणि कष्टाळू विद्यार्थी आहे. तो दहावीपासूनच काही ना काही काम करत आपला उदरनिर्वाह त्याने केला आहे. शिक्षण घेत असतानाच त्याने एका चांगल्या कंपनीत कामही सुरू केले होते. मात्र, कॉलेजची वेळ आणि नोकरीची वेळ यांचा मेळ बसत नसल्याने ओमला ती नोकरी सोडावी लागली. नोकरी सोडल्यानंतरच्या काळात ओमने इलेक्ट्रिशियनची कामंही केली. इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असा विचार त्याने केला.
advertisement
यातूनच त्याने खाद्यपदार्थांचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून कॉलेजला जाताना व्यवसाय करणेही शक्य होईल. याच उद्देशाने त्याने 'फूड हब पाणीपुरी' नावाने आपले पाणीपुरी सेंटर सुरू केले. सकाळी कॉलेज आणि सायंकाळी आपली पाणीपुरीची गाडी लावून, हा तरुण त्याच्या पालकांना घर चालवण्यासाठी मदत करत असतो. त्याच्या पाणीपुरीच्या खास चवीमुळे तो अल्पावधीतच चांगलाच परिचित झाला. व्यवसाय उत्तमरित्या चालत असल्याने, इतरांच्या हाताखाली नोकरी का करावी? याऐवजी स्वत:चा व्यवसाय पुढे वाढवावा, असा विचार आता ओमचा झाला आहे.
यासाठी तो त्याच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इतकेच नव्हे, तर ओम स्वत:चा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळून, केवळ स्वत:चे स्वप्न पूर्ण करत नाही, तर त्याच्याकडे काम करणाऱ्या लोकांचे घर चालवण्यासाठीही मदत करत आहे. "इतरांच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा आपण आपले मालक बनावे", या ओमच्या विचाराने नाशिकमधील इतर तरुणांनाही प्रेरणा दिली आहे. यामुळे या तरुणाला नाशिकमध्ये एक 'युवा उद्योजक' म्हणून खास मान मिळाला आहे.