पुढील ५ दिवसांचा
राज्यात किमान तापमानात कोणताही मोठा बदल जाणवणार नाही. वातावरण कोरडे राहील. पुढील ३ दिवस उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र प्रामुख्याने नाशिक, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यात हुडहुडी वाढेल. त्यानंतरचे २ दिवस म्हणजे १८ जानेवारीपासून तापमानात पुन्हा २ ते ३ अंशांनी वाढ होऊन थंडीचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल अशी माहिती हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिली.
advertisement
उत्तर भारतात रेड अलर्ट, महाराष्ट्रावर परिणाम?
पंजाब, हरियाणा आणि चंदिगडमध्ये सध्या भीषण शीत लहरीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेथील काही भागांत दृश्यमानता शून्य मीटरवर पोहोचली आहे. या थंड वाऱ्यांचा प्रवाह महाराष्ट्राकडे येत असल्याने, विशेषतः पहाटेच्या वेळी उत्तर महाराष्ट्रात दाट धुक्याची चादर पाहायला मिळू शकते. नाशिक, धुळे आणि जळगावमध्ये तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. पुण्यातही रात्रीचा गारवा वाढणार असून किमान तापमान १२ ते १३ अंशांपर्यंत खाली येऊ शकते. मुंबईत थंडीचा कडाका उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत कमी असेल, मात्र रात्रीच्या हवेत गारवा जाणवेल.
कोकणात ढगाळ वातावरण राहणार
हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू आणि केरळच्या आसपास साक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाचा जोर राहणार आहे. तर उत्तरेकडे लडाखपर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पाऊस, हिमवृष्टी आणि थंडीचा कडाका कायम राहणार आहे. अरबी समुद्रात सध्या काही हालचाल जाणवत नाही. त्यामुळे तूर्तास अवकाळीचा धोका नाही. मात्र दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकणात काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतात पावसाचा जोर ओसरणार
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडत होता. मात्र, पुढील ३ दिवसांत दक्षिण भारतातील हा पाऊस पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलून महाराष्ट्रात कोरडी थंडी वाढण्यास मदत होईल.
