महाराष्ट्रात पुढील ५ दिवसांत तापमान घसरणार
महाराष्ट्रातील हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, पुढील चार ते पाच दिवसांमध्ये तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचा अर्थ, राज्यातील नागरिकांना लवकरच थंडीची चाहूल जाणवेल. विशेषतः महाराष्ट्राच्या संलग्न असलेल्या गुजरात राज्याच्या तापमानातही पुढील तीन दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. यानंतर, किमान तापमानात फार मोठा बदल अपेक्षित नाही. या बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान कोरड राहील.
advertisement
विदर्भात थंडीची चाहूल
दक्षिण कोकण आणि दक्षिणमध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यातून पावसाचे सावट दूर झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये मात्र विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 7 नोव्हेंबर रोजी अंशतः ढगाळ हवामान राहील. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश एवढे राहील. कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भातील किमान तापमानात घट होणार आहे. यामुळे थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरूच
हवामान प्रणालीतील बदलानुसार, सध्या मध्य बंगालचा उपसागर ते पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत एक निम्न दाब पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा तामिळनाडू आणि कर्नाटकातून जात आहे, ज्यामुळे तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवसांत तामिळनाडूमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, ८ ते १० नोव्हेंबर या काळात केरळमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा प्रभाव दिसून येईल. मागील २४ तासांत तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात तब्बल १२ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मध्य भारतात थंडीची चाहूल, पूर्व उत्तर प्रदेशात गारठा
महाराष्ट्रासह देशाच्या मध्य भागातही तापमानात घट दिसून येणार आहे. छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशमध्ये पुढील ४८ तासांत २ ते ४ अंश सेल्सिअसने तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन-चार दिवस तापमानात विशेष बदल अपेक्षित नाही. याव्यतिरिक्त, पूर्व उत्तर प्रदेशच्या तापमानातही पुढील २४ तासांत २ ते ४ अंश सेल्सिअसची घट अपेक्षित आहे. तर, पूर्व भारतातील तापमानात लगेच बदल होणार नसला तरी, त्यानंतरच्या दोन दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.
