आईचा हात सुटल्यानं प्रवाहासोबत चिमुकला वाहून गेला आणि त्याला वाचवण्यासाठी आई हंबरडा फोडत पाहिली. पाण्याचा प्रवाह जास्त होता. अखेर दीड तासानंतर चिमुकल्याचा मृतदेह कुटुंबियांच्या हाती लागला. बीड जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. कळसाने गावातील केवळ दहा वर्षांचा आदित्य बिंदुसरा नदीच्या पूराच्या पाण्यात वाहून गेला आणि त्याचा मृतदेह काही तासांच्या शोधानंतर मिळाला. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली.
advertisement
रविवारी सुट्टी असल्याने आईसोबत जायचा हट्ट आदित्यने केला. दुपारी गावात अचानक पावसाचा जोर वाढला आणि आधीच तुडुंब भरलेली बिंदुसरा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली. त्या वेळी आदित्य सुट्टी असल्यामुळे आईसोबत शेतात गेला होता. बाजरीची कणसं कापायची कामं सुरू होती आणि काही जनावरं शेतात अडकली होती. गावकरी ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच पावसाचा जोर वाढला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
या गोंधळात आईचा हात घट्ट पकडलेला सुटला आणि आदित्य क्षणार्धात पुराच्या लाटांमध्ये वाहून गेला. आईने मदतीसाठी आरडाओरडा केला, पण आसपास कोणीच नव्हतं. काही वेळाने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांनी मिळून शोधमोहीम सुरू केली. जवळपास तासाभरानंतर आदित्यचा मृतदेह पूराच्या पाण्यात सापडला.
घटनेनंतर आदित्यच्या आईचा आणि आजीचा अश्रू थांबत नाहीये. आमच्या डोळ्यांसमोर सगळं घडलं. पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की काहीच करता आलं नाही. आमच्याजवळच होता, पण हातातून सुटून गेला, असं सांगताना आदित्यच्या आईचा आवाज थरथरत होता. आजी मनातून पुरती तुटली होती, तोंडातून शब्दही फुटत नव्हते हे काय होऊन बसलं असं म्हणत ती स्वत: लाच दोष देत होती. रविवार होता म्हणून शेतात नेलं, पण परत आणू शकले नाही… असं म्हणत राहिली.
आदित्य जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होता. आदित्य गेल्यापासून घरात चूलही पेटलेली नाही. खांद्यावर खेळवलेल्या नातवाच्या मृत्यूनं आजी कोसळली आहे. संपूर्ण गाव या दुर्घटनेनं हादरलं आहे. बीड जिल्हा साधारणपणे दुष्काळासाठी ओळखला जातो, पण या वेळी निसर्गाने उलट कहर केला. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला या घटनेची दखल घेऊन आदित्यच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.