माथेरान: राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच मुंबईजवळील थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका स्मशानभूमीमध्ये अघोरी विद्येचा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार निवडणुकीच्या तोंडावर केला असल्याचा संशय अशून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी अमावास्या होती. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास माथेरान स्मशानभूमीत अघोरी पूजा झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आज नगरपालिका कर्मचारी विजय चव्हाण अंतिम संस्कार स्थळाची तयारी पाहण्यासाठी स्मशानभूमीत आल्या असता त्यांनी हा प्रकार पाहिला.
advertisement
स्मशानभूमीत काय आढळलं?
स्मशान भूमीमध्ये एका बाजूला लाल भोपळे, सुरी, त्यावर ठोकलेल्या अगरबत्त्या, दोन मोठी मडकं, छोट्या बकराची मुंडी, माशांचे तुकडे असं एका ताटामध्ये ठेवण्यात आलं होतं. एवढंच नाहीतर या ताटाभोवती रक्त सांडलेलं दिसून आलं. बाजूला एक दगडावर एक बाहुली खिळ्याने ठोकलेली होती. तसंच, दारूची बाटली होती अख्खा खंबा ठेवलेला होता. स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या दोन खड्ड्यांमध्येही काहीतरी विधी करून ठेवली होती, असं विजय चव्हाण यांनी सांगितलं.
दरम्यान, माथेरानमध्ये सध्या नगर पंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचं वातावरण आहे. या निवडणुकीच्या काळात असा प्रकार समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रकार काळी जादू करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
