महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतून अनेक प्रबळ दावेदार रिंगणात आहेत. संख्याबळ पाहता राष्ट्रवादीकडे भाजपापेक्षा दोन जागा अधिक असल्याने “महापौरपद आमचंच” असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. मात्र भाजपही या पदावर ठाम आहे. प्रत्यक्षात, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निर्णयावरच अंतिम शिक्कामोर्तब होणार, हे राजकीय जाणकार सांगतात.
advertisement
राज्यातील महापालिकांमध्ये महापौरपदावरून दावे–प्रतिदावे सुरू असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात एकमेव अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्याने, राष्ट्रवादीचा दावा अधिक बळकट मानला जात आहे. सध्याचे महापौरपद महिला अनुसूचित जातीसाठी राखीव होते.
जाणकारांच्या मते, एकदा राखीव प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यामुळे यावेळी महापौरपद सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र आरक्षण निघाल्यावरच आम्ही महापौर निवडीच्या पंधरा मिनिटे आधी महापौर कोण हे जाहीर करू असे खासदार सुजय विखे यांनी सांगितले आहे.
कुणाला किती वेळा संधी?
पुरुषांना सहा वेळा, महिलांना तीनदा संधी
२००३ ते २०२१ या १८ वर्षांच्या कालावधीत
पुरुषांना ६ वेळा, महिलांना ३ वेळा संधी.
यंदा महापौर महिला की पुरुष? आणि कोणत्या प्रवर्गातून? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आतापर्यंतचे महापौर आणि आरक्षण
भगवान फुलसौंदर – ओबीसी (जाने. २००४ ते जून २००६)
संदीप कोतकर – खुला प्रवर्ग (जुलै २००६ ते डिसें. २००८)
संग्राम जगताप – ओबीसी (जून २००९ ते जून २०११)
शीला शिंदे – महिला राखीव (जुलै २०११ ते डिसें. २०१३)
संग्राम जगताप – खुला प्रवर्ग (जाने. २०१४ ते एप्रिल २०१५)
अभिषेक कळमकर – खुला प्रवर्ग (जून २०१५ ते जून २०१६)
सुरेखा कदम – महिला राखीव (जुलै २०१६ ते डिसें. २०१८)
बाबासाहेब वाकळे – खुला प्रवर्ग (जून २०१९ ते जून २०२१)
रोहिणी शेंडगे – महिला अनुसूचित जाती (जुलै २०२१ ते डिसें. २०२२)
