अहिल्यानगर: अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. एका गटाने शेकडोंच्या संख्येनं नगरच्या कोटला परिसरात येत रास्ता रोको आंदोलन केलं. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शांततेचे आव्हान केले आहे.
advertisement
राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, कोटला गावातील या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचे टाळावे, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले. विखे-पाटील यांनी म्हटले की, “ज्याने रांगोळी काढली होती त्याला कालच अटक करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर निदर्शने आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती असेही त्यांनी म्हटले.
संग्राम जगतापांचेही कान टोचले...
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “वाचाळवीर पुढाऱ्यांनी अशा वक्तव्यांना थांबवले पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्रात आपण राहतोय, त्यामुळे कोणत्याही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, असे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील जबाबदारीने बोलावे, चुकीची वक्तव्य टाळावे असे सांगणार असल्याचे विखे यांनी म्हटले.
नगरमध्ये काय झालं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रस्त्यावर रांगोळी काढली होती. त्या रांगोळीवरून एका समाजाने त्यावर आक्षेप घेतला. त्यावरून एक गुन्हा दाखल केला होता. ज्याने रांगोळी काढली होती, त्याला पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर संबंधित गटाचे काही लोक कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रास्ता रोको केला. त्यांना रस्त्यावरून हटण्याची सूचना केली, विनंती केली, तरीही ते तिथून निघून जात नव्हते. त्यातील काहींनी अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला.