महाराष्ट्राच्या अगोदर हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणूका पार पडल्या आहेत. हरियाणात काँग्रेस सत्तेवर येणार असा दावा अनेकांनी केलेला असताना काँग्रेसचा दारूण पराभव झाला.
या पराभवाला इतर कोणी नाही तर आमचाच गोंधळ कारणीभूत ठरला असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कबूल केलं. महाराष्ट्रात आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असून 180 पेक्षा जास्त जागा जिंकत महाविकास आघाडी सत्तेवर येईल असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केलाय...
advertisement
हरियाणात झालेल्या पराभवाचे परीक्षण आम्हाला करावं लागेल. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीच्या बाबतीत सुद्धा विचार करावा लागेल असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.
राज्यात आम्ही मोठा भाऊ आहोत असं कधीही आम्ही म्हटलं नाही. आघाडी म्हणूनच देश आणि राज्य वाचवण्यासाठी पुढे जावं लागेल. आणि त्यासाठी काँग्रेसचा पुढाकार असेल असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी जर काँग्रेसला वेगळं लढायचं असेल तर भूमिका स्पष्ट करावी या प्रश्नावर थोरात म्हणाले, काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवेल.
पराभव धक्कादायक, राहुल गांधी यांनी हरियाणातील काँग्रेस नेत्यांना खडसावले
हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाची चिंतन बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी संपन्न झाली. काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत पराभवाची कारणमीमांसा केली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचाही हजेरी होती.
काँग्रेस पक्षाच्या हितापेक्षा वैयक्तिक हिताला तुम्ही अधिक महत्त्व दिले, अशा शब्दात राहुल गांधी यांनी हरियाणाची जबाबदारी असलेल्या नेत्यांना खडसावले. हरियाणाची निवडणूक जाहीर झाल्यापासून पक्ष नंतर आधी आपले हित असेच आपल्या नेत्यांचे धोरण राहिले, अशा शब्दात राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
