बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील 'सुदर्शन' निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना झाली. त्यानंतर पत्रकारांशी विविध राजकीय मुद्द्यांवर संवाद साधला. फडणवीस यांच्या आधुनिक अभिमन्यू वक्तव्यावरून त्यांनी टोला हाणला तर अजित पवार यांच्यावरील निधी वाटपाच्या भेदभावाच्या आरोपाला समर्थन दिले.
देवेंद्र फडणवीस अडचणीत आहेत पण त्यांची ही अवस्था पक्षानेच केली, बाळासाहेब थोरातांचे सूचक वक्तव्य
advertisement
मविआच्या काळात आम्हीही अजित पवार यांच्याविरोधात तक्रार केली होती
बाळासाहेब थोरात म्हणाले, पाच वर्ष निधी वाटपात प्रचंड भेदभाव झाला. काही आमदारांना प्रचंड निधी तर काहींना निधीच दिला गेला नाही. पाच वर्षे भेदभाव करण्याचे काम अर्थ विभागाकडून झाले. पाच वर्षे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही देखील तक्रार केली होती, असा गौप्यस्फोट बाळासाहेब थोरात यांनी केला.
निधी वाटपात पक्षपात होतो ही वस्तुस्थिती, गुलाबरावांच्या वक्तव्याशी मी सहमत
अजित पवार यांच्या अर्थखात्याकडे पाणीपुरवठा विभागाची फाईल गेली होती. त्यावर सातत्याने नकारात्मक शेरा मारून ते माघारी पाठवत असत पण मी देखील पाठपुरावा करण्याचे सोडले नाही. अर्थखात्यासारखे नालायक खाते नाही, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले होते. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत सारेच आलबेल नसल्याच्याही चर्चा झाल्या. यावरच थोरात यांना विचारले असता, निधी वाटपात पक्षपात होतो ही वस्तुस्थिती असल्याचे सांगत गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो, असे थोरात यांनी सांगितले.
