बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील 'सुदर्शन' निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना झाली. त्यानंतर पत्रकारांशी विविध राजकीय मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावरील राजकीय अडचणी अधोरेखित केल्या. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला आधुनिक अभिमन्यूची उपमा दिलेली आहे. मात्र चक्रव्यूहातून बाहेर पडताना या अभिमन्यूची अवस्था काय होणार हे माहिती नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
advertisement
आधुनिक अभिमन्यूची चक्रव्यूहातून बाहेर पडताना काय अवस्था होईल, माहिती नाही
देवेंद्र फडणवीस हे शंभर टक्के राजकीय अडचणीत आहेत. मात्र हे ही लक्षात घ्यावे लागेल की देवेंद्र फडणवीसांची आजची स्थिती कुणी दुसऱ्याने केली नाही. ती त्यांच्या पक्षानेच केली आहे, विरोधकांनी नव्हे. ज्यांना चक्की पिसिंग म्हणून जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला, त्यांनाच सोबत घेण्याची जबाबदारी फडणवीसांवर टाकण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी स्वतःला अभिमन्यूची उपमा दिली. मात्र चक्रव्यूहातून बाहेर पडताना या अभिमन्यूची अवस्था काय होणार हे माहिती नाही, असे थोरात म्हणाले.
विरोधकांना प्रश्न विचारताय म्हणजे ते पळवाट शोधतायेत
ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्याला महाविकास आघाडीचे समर्थन आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला होता. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, सरकार त्यांचे आहे, सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाची मागणी पूर्ण करा आम्हीही पाठीशी राहू. विरोधकांना प्रश्न विचारताय म्हणजे ते पळवाट शोधत आहेत. सरकारने जरांगे यांच्याशी नवी मुंबईत काय तडजोड केली आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही विरोधकच आहोत, आमच्याकडून काय अपेक्षा करता? असे थोरात म्हणाले.
