IAS पूजा खेडकरांच्या चौकशीसाठी केंद्राने नेमली समिती
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक समिती नेमली आहे. त्या समितीने अहवाल मागवला आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्या पत्रानुसार अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे शासकीय रुग्णालयामध्ये देण्यात आलेले डोळ्याचे दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र दिले होते तर पाथर्डी आणि शेवगावचे प्रांत यांनी नॉन क्रिमिनिलीयर प्रमाणपत्र दिले होते. या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती आणि खुलासा घेऊन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बोलवले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
advertisement
पूजा खेडकर यांची प्रतिक्रिया काय?
या सर्व प्रकरणावर वाशिम येथे आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. खेडकर म्हणाल्याक की, ‘तुम्ही मला वेगवेगळे आरोप सांगितले आहेत, कमिटी मला जे काही प्रश्न विचारेल त्याचं मी पूर्ण स्पष्टीकरण देईन. मी सगळं कायदेशीर देईन. मी समितीसमोर साक्ष देईन. समिती जो निर्णय घेईन तो सगळ्यांनाच मान्य होईल, मीदेखील तो निर्णय मान्य करेन’, असं पूजा खेडकर म्हणाल्या आहेत.
पोलीस आई-वडिलांचा शोध घेत आहेत, असा प्रश्न विचारला असता पूजा खेडकर यांनी उत्तर देणं टाळलं आहे. ‘त्या विषयावर मला काहीही माहिती नाही. मी त्यावर कमेंट करू शकत नाही. माझं काम प्रोबेशनर म्हणून इथे शिकायचं आहे आणि मी इकडे तेच करत आहे. बाकीच्या गोष्टींवर मी बोलू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया पूजा खेडकर यांनी दिली आहे.
वाचा - पूजा खेडकर खरंच दिव्यांग आहेत का? डॉक्टरांचं सर्टिफिकेट आलं समोर
‘तुम्ही मला टेकनिकल गोष्टी विचारत आहात, त्यासाठीच त्यांनी तज्ज्ञांची समिती नेमली आहे. तज्ज्ञांच्या समितीला ठरवू दे. मी, तुम्ही किंवा सामान्य नागरिक यावर काहीही बोलू शकत नाही. सरकारमधले तज्ज्ञ यावर निर्णय घेतील, त्यानंतर सत्य समोर येईल. समितीचा निर्णय सगळ्यांसमोर असेल. चौकशी काय सुरू आहे, समितीची माहिती गोपनीय ठेवावी लागते, या गोष्टीमध्ये मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही’, असं उत्तर पूजा खेडकर यांनी दिलं आहे.
तुम्हाला आणि कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे का? असा प्रश्नही पूजा खेडकर यांना विचारण्यात आला. ‘जे काही होत आहे ते सगळ्यांना दिसत आहे, मला यावर काहीही बोलायचं नाही. मला सामान्य नागरिकांवर विश्वास आहे, मला मीडियावरही विश्वास आहे. प्रत्येकाला काय होतंय ते माहिती आहे. गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण निदोर्ष हे आपलं संविधान सांगतं. मीडिया ट्रायलमध्ये मला गुन्हेगार दाखवलं जात आहे, हे चुकीचं आहे’, असं म्हणत पूजा खेडकर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.
